छत्रपती संभाजीनगर : दिवाळी २५ दिवसांवर आली असतानाच अयोध्यानगरीतील फटाका मार्केटवर गदा येण्याची शक्यता आहे. एका धार्मिक कार्यक्रमामुळे फटाका मार्केट कर्णपुरा मैदानावर किंवा पुन्हा जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरविण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत चर्चा झाली. बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, फटाका असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
फटाका मार्केटसाठी अयोध्यानगरी व्यतिरिक्त अन्य जागेचा शोध घेण्याच्या सूचना डॉ. कराड यांनी प्रशासनाला दिल्या. २०१६ साली जि. प. मैदानावरील फटाका मार्केटला आग लागली होती. त्यामुळे २०१७ पासून अयोध्यानगरीची जागा संरक्षणखात्याकडून फटाका मार्केटसाठी घेण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांपासून दिवाळीनिमित्त फटाक्यांचे मार्केट ४० एकर जागेवर भरविण्यात येत आहे. यंदा ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन हिंदू जनजागरण समितीतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे मार्केट अन्यत्र स्थलांतरित करावे लागणार आहे.
जय महाराष्ट्र फटाका असोसिएशनचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले की, सोमवारी प्राथमिक बैठक होती. छावणी परिषदेसोबत असोसिएशनचा करार झाला आहे. परवानगी मिळालेली आहे. लवकरात लवकर पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास निर्णय होईल.
२०१६ साली जळाले होते ते मार्केट...२९ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी १०:३० वा. जि. प. मैदानावरील फटाका मार्केट जळून खाक झाले होते. १४० दुकानांची परवानगी असताना तेथे १८० दुकाने थाटण्यात आली होती. त्या घटनेमुळे जि. प. मैदान फटाका मार्केटसाठी मिळत नाही. २०१७ पासून छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट २०१७ पासून भरविण्यात येत आहे. पोलिस, मनपा, पीडब्ल्यूडी, छावणी, फायर ब्रिगेडची परवानगी मार्केटसाठी आवश्यक असते.
१५ कोटींचा माल केला आहे बुक....फटाका असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय वाघचौरे यांनी सांगितले, की १५ कोटींचा माल बुक झालेला आहे. ६५ दुकाने तेथे उभारण्याचे नियोजन आहे. सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत. जि. प. मैदानावर परवानगी मिळणे अवघड आहे.