लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील सभेत अर्थसंकल्पात सूचविलेल्या बदलांचा कार्यवृत्तांतात समावेश न केल्यामुळे विरोधी सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूवपूर्व गोंधळ घातला. अध्यक्षांसमोरच विषय पत्रिका फाडून सभागृहात भिरकावल्या. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सभा आटोपती घेत गोंधळात सर्व ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. यामुळे आणखीच आक्रमक झालेल्या विरोधी सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांना दीड तास घेराव घातला.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात झाली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, मुख्याधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मु्ख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखाधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्यकार्यकारी अधिकारी निखील ओसवाल यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच विरोधी सदस्य शालिग्राम म्हस्के व अवधूत खडके यांनी अनुपालन अहवाल अगोदर का दिला नाही, हा मुद्दा उपस्थित केला. मागील सभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेचा कार्यवृत्तांतात सविस्तर उल्लेख न करता अर्धवट मांडणी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी बजेट कमी करण्याचे सूचविले होते, तिथे वाढविण्यात आले असल्याचा आरोप राहुल लोणीकर यांनी केला. याच मुद्यावरून अन्य विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.कार्यवृत्तांत तयार करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी शालिग्राम म्हस्के यांनी केली. त्यावर उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पाबाबत मागच्या सभेत आठ तास चर्चा झाली आहे. आता पुन्हा त्याच विषयावर न बोलता विषय पत्रिकेवर चर्चा करण्याच्या सूचना टोपे यांनी केल्या. अध्यक्ष खोतकर यांनी विरोधी सदस्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत विषय पत्रिकेवर चर्चा करण्याचे आवाहन केले.मात्र, ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले सर्वच विरोधी सदस्य थेट सभागृहातील मोकळ्या जागेत येऊन त्यांनी ठिय्या दिला. आशा पांडे, गंगा पिंगळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. राहुल लोणीकर, शालिग्राम म्हस्के व अवधूत खडके याच मुद्यावर अध्यक्षांशी चर्चा करत असताना अन्य सदस्यांनी विषय पत्रिका फाडून हवेत सभागृहात भिरकावल्या. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. विरोधी सदस्य सभागृहाचे कामकाज चालू देण्याच्या मनस्थितीत नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर अध्यक्षांनी विषय पत्रिकेवरील ठराव वाचण्यास सुरुवात केली.विरोधी सदस्य वगळता शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सर्व ठराव मंजूर असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे विरोधीबाकांवरील सदस्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळात भर पडली. शेवटी गोंधळाच्या वातावरणातच सर्व ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करत सभा संपल्याचे अध्यक्ष खोतकर यांनी जाहीर केले. दरम्यान, सभेच्या सुरुवातीला स्व. बद्रीनारायण बारवाले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर भाजपच्या वतीने राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
विषयपत्रिका फाडल्या, अध्यक्षांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 1:00 AM