औरंगाबाद : ‘गर्जे महाराष्ट्र ग्लोबल इनोव्हेशन अकॅडेमी’ या अमेरिकास्थित आणि जागतिक पातळीवर कार्यरत यशस्वी महाराष्ट्रीयन उद्योजक, व्यावसायिक, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचा समावेश असलेल्या सेवाभावी संस्थेच्यावतीने महाराष्ट्रीयन नवउद्योजकांना मोठी झेप घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
‘मॅजिक’ने (मराठवाडा ॲक्सलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल) ‘गर्जे महाराष्ट्र’सोबत सामंजस्य करार केला असून, या माध्यमातून आता ‘सिलिकॉन व्हॅली’च्या धर्तीवर नवउद्योजकांसाठी निःशुल्क सोळा आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करण्यात आला आहे.
‘गर्जे महाराष्ट्र ग्लोबल इनोव्हेशन अकॅडेमी’ ही एक बिगरराजकीय, बिगरव्यावसायिक आणि कोणत्याही प्रकारे नफा न कमावणारी संस्था आहे. याद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सेवा नि:शुल्क असतील आणि संस्था कोणाकडूनही कसल्याही प्रकारे आर्थिक सहभाग घेत नाही. संस्थेचे संस्थापक आनंद गानू असून, या प्रकल्पाचे संचालन अलंकार जोशी आणि सुधीर कदम करीत आहेत. जागतिक क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन दिनाचे औचित्य साधून बुधवारी २१ एप्रिल रोजी संस्थेचा मॅजिकबरोबर सामंजस्य करार झाला आहे.
नवोन्मेषी उद्योजकांना जागतिक पातळीवर सक्षमपणे उभे करण्यासाठी ‘गर्जे महाराष्ट्र ग्लोबल’चे हे मार्गदर्शक नवनवीन वाटा दाखवतील, नवनवीन विचारांशी परिचय करवून देतील, उच्च दर्जा प्राप्तीसाठीच्या दिशा, प्रयत्न याबाबत मार्गदर्शन करतील. ‘मॅजिक’च्या माध्यमातून नवउद्योजकांना मार्गदर्शन करणाऱ्या निष्णात मार्गदर्शकांचाही यात सहभाग असणार आहे.
पात्र उद्योग आणि उद्योजकांनी यात सहभाग घेऊन जागतिक पातळीवरील अत्युच्य दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन प्राप्त करावे आणि उत्तुंग यशाला गवसणी घालावी, असे आवाहन संस्थापक श्री. आनंद गानू यांनी केले आहे.
चौकट.......
नवीन उद्योजकांसाठी आयोजित या सोळा आठवड्यांच्या प्रशिक्षणामध्ये उद्योगाच्या प्रारंभीच्या काळात आवश्यक दृष्टिकोन, साधने आणि कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले जाईल. यात सहभागींना हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपली अंगभूत कौशल्ये अधिक विकसित करून ती आपल्या गुंतणूकदारांसमोर सादर करता येतील. आपला उद्योग सुरू करताना, विकसित करताना किंवा विस्तार करताना येथील प्रशिक्षकांचे नियमित मार्गदर्शन घेता येईल. या प्रशिक्षणादरम्यान यात सहभागींना येणाऱ्या अडचणी, अनुभव हे सर्वच प्रशिक्षकांसमोर दर आठवड्याला सादर केले जातील. हे संपूर्ण प्रशिक्षण निःशुल्क असणार आहे.