औरंगाबाद -महाज्योती कडून फेलोशिप देण्यात येणाऱ्या केवळ २०० जागा पुरेशा नाहीत. ओबीसी, भटके- विमुक्त व इतर विशेष मागास प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सारथी ने सरसकट फेलोशिप दिली. त्यामुळे महाज्योतिकडून सरसकट पात्र, विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या, अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संशोधक विद्यार्थी विभागीय महाज्योती कार्यालयात जमून आंदोलन करत आहेत. वारंवार निवेदने, आंदोलने करून अद्याप काहीच तोडगा न निघाल्याने नागपुर येथे महाज्योतीच्या बैठकीकडे संशोधक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
बार्टी व सारथी या दोन्ही संस्था संशोधक विद्यार्थ्यांना घरभाडे म्हणून पहिले दोन वर्ष ७४४० प्रति महिना व नंतरचे तीन वर्ष ८४०० प्रतिमहिना देतात. आकस्मिक खर्च म्हणून पहिले दोन वर्ष १२ हजार प्रति वर्ष व नंतरचे तीन वर्षासाठी २५ हजार प्रती वर्ष या प्रमाणे देते. याशिवाय ३ टक्के दिव्यांगांसाठी अतिरिक्त साहाय्य म्हणून २ हजार प्रती महिना देण्यात येतो. सारथी बार्टीकडून फेलोशिप मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत महाज्योतीकडून संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय का असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलनासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे राज्य अध्यक्ष बळीराम चव्हाण यांच्यासह संशोधक नागपूर येथे रवाना झाले तर उर्वरित विद्यार्थी विभागीय कार्यालयात जमले आहेत.