औरंगाबाद : मागच्या सरकारने व आमच्या सरकारनेही काय गंमत म्हणून केंद्राकडे पत्रव्यवहार केला काय? देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनीही पत्रव्यवहार केला. तेव्हाच ओबीसींचा इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून दिला असता, तर आज ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले नसते. ते टिकले असते, आमचे सरकार आले आणि कोरोना सुरू झाला. मग तो काय आम्ही आणला काय? असा घणाघात महाराष्ट्राचे ओबीसी खात्याचे व मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी घातला. ( Mahajyoti substation to start soon in Aurangabad, Vijay Vadettiwar declares )
मंडल दिनानिमित्त दोदडगाव, ता. गेवराई येथील मंडल स्तंभाला अभिवादन करायला जाण्यापूर्वी ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. याच वेळी त्यांनी औरंगाबादेत महाज्योतीचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा केली. येत्या पंधरा दिवसात जागेचे काम झाले तर लवकरात लवकर हे उपकेंद्र कार्यान्वित करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत ओबीसींसाठी राज्यात ७२ वसतिगृहांना मान्यता देण्यात आली. तांडा वस्ती सुधार योजना व वसंतराव नाईक घरकुल योजनेला निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. महाज्योतीला १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ४० कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार राजेश राठोड, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, बालाजी शिंदे, बाळासाहेब सानप आदींची यावेळी उपस्थिते होती.