- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : अभिनंदनला पाकिस्तानी सैन्याकडून पकडण्यात आले आहे, असे जेव्हा समजले तेव्हा ते दोन दिवस आम्हा सगळ्या कुटुंबासाठीच अत्यंत बेचैनीचे होते. त्याच्या सुटकेसाठी आम्ही अखंडपणे महामृत्युंजय जप करीत होतो. त्या दोन रात्री आमच्या डोळ्याला डोळा लागला नाही; पण अखेर सव्वाकरोड देशवासीयांची ‘दुवा’ फळाला आली आणि ‘अभिनंदन’ भारतात परतला, अशा शब्दांत अभिनंदन यांच्या चुलत सासूबाई सुमन मारवा यांनी आम्ही मैत्रिणी ग्रुपशी संवाद साधला.
संपूर्ण देशवासीयांसाठी ‘हीरो’ ठरलेल्या अभिनंदन वर्धमान यांचे चुलत सासू-सासरे औरंगाबादेत राहतात. चुलत सासरे कर्नल निर्भय मारवा यांची पोस्टिंग औरंगाबाद येथे होती. २००० साली ते औरंगाबादेत आले आणि आता सेवानिवृत्त होऊन येथेच स्थायिक झाले आहेत. अभिनंदन भारतात परतल्यानंतर ‘आम्ही मैत्रिणी’ ग्रुपतर्फे मारवा दाम्पत्याची भेट घेण्यात आली आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. चारुलता रोजेकर, नेहा गुंडेवार, डॉ. सुशीला निकम, शोभा बोडखे, पूर्वा बोंडेवार, डॉ. ज्ञानदा कुलकर्णी, रश्मी आहेर, डॉ. आसावरी क ौशिके, वर्षा कंधारकर यांनी त्यांची भेट घेतली.
देशवासीयांची प्रार्थना कामी आलीअभिनंदनला पाकिस्तानी सैनिकांनी पकडले आहे, अशी वार्ता येताच संपूर्ण देशातूनच त्याच्यासाठी प्रार्थना सुरू होती. शत्रू राष्ट्राने त्याला पकडणे, तेथून त्याची सुटका होणे आणि तो सुखरूप मायदेशी येणे हे सर्वच चमत्कारिक असून, हे भारतवासीयांनी त्याच्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळेच शक्य झाले आहे. आमचा पूर्ण परिवार देशबांधवांप्रती मनापासून कृतज्ञ आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमचे सर्व कुटुंबच ‘फौजी’आमचे सर्व कुटुंबच ‘फौजी’ असून, देशसेवेत आहे. अभिनंदनची पत्नी तन्वी, आई-वडील, काका, भावंडे या सर्वांनीच भारतीय सैन्य दलात काम केलेय. ‘जाऊंगा तो जीतकरही आऊंगा’ अशी प्रामाणिक जिद्द प्रत्येक जवानाच्या मनात असते आणि याच जिद्दीने प्रत्येक सैनिकाचा संघर्ष सुरू असतो. अशीच जिद्द अभिनंदननेही दाखविली, यामुळे सगळ्या देशवासीयांप्रमाणे आम्हालाही त्याचा अभिमान आहे, असे मारवा दाम्पत्य म्हणाले.