छत्रपती संभाजीनगर : महानंद सहकारी दूध संघ चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, विरोधक अभ्यास न करता उगीचच गैरसमज पसरवत आहेत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिले.
ते म्हणाले, महानंद डेअरी डबघाईला आली आहे. तिला उर्जितावस्था देण्यासाठी ‘एनडीडीबी’ने प्रस्ताव दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तोटा भरून काढण्यासाठी सरकारने भागभांडवल द्यावे. व्यवस्थापन त्यांचे राहील. यापूर्वी जळगाव येथील डेअरी चालविण्यासाठी ‘एनडीडीबी’ने घेतली होती. ती सुस्थितीत आल्यावर आता ती लोकप्रतिनिधी चालवतात. दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महानंद संबंधीचा निर्णय घेतला जाईल.
विरोधक मात्र, आता महानंदची मोक्याची ५० एकर जागा जाणार, ही डेअरी गुजरातच्या घशात घातली, असे थोतांड पसरवत आहेत. नेहमीच गुजरातच्या नावाने खडे फोडायचे, ही त्यांची निवडणुकीची लाईन ठरलेली आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.