औरंगाबाद : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करू नये. घराघरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासन तसेच ज्येष्ठ समाजबांधवांनी केले आहे.
६ डिसेंबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त दरवर्षी भडकल गेट तसेच विद्यापीठ गेटसमोरील पुतळ्याजवळ तसेच शहरांतील विहारांमध्ये हजारो अनुयायी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत असतात. यंदा कोरोनाचा सामना करण्यासाठी समाजबांधवांसह पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी अनुयायांनी आपल्या घरातच बाबासाहेबांना अभिवादन करावे. समाज माध्यमावर यासंबंधीचे फोटो किंवा चलचित्र टाकावेत, बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ, विहारांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ५० व्यक्तींपेक्षा जास्त अनुयायांनी गर्दी करू नये, आपापल्या घरातच बुद्धवंदना, त्रिशरण पाठ घेऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवाद करावे व शासनाने हाती घेतलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यास हातभार लावावा, असे आवाहन समाजातील जाणकारांनी केले आहे.
विद्यापीठातही मर्यादित स्वरूपात अभिवादन कार्यक्रमकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या हस्ते सकाळी १० वाजता अभिवादन केले जाणार असून, यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियम व अटींचे पालन करून मोजकेच संवैधानिक अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.
सायंकाळी ६ वाजता एकाच वेळी अभिवादनजयेश तुषार मोरे, वनिता मोरे, दौलत मोरे, डॉ. ऋषिकेश कांबळे, निवृत्त न्या. अजिंक्य कांबळे, प्रा. प्रताप कोचुरे व अन्य काही समाजबांधवांनी आठ दिवसांपासून शहरात एक मोहीम राबविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भडकल गेट येथे आंबेडकरी अनुयायांनी गर्दी न करता आपापल्या घरात, वस्त्यांमध्ये, कार्यालयामध्ये सायंकाळी ६ वाजता उभे राहून एकाच वेळी बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे या मोहिमेद्वारे आवाहन केले आहे. भडकल गेट येथे पोलीस बॅण्ड पथक व मोजक्याच अनुयायांच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन केले जाणार आहे.