औरंगाबाद : महाराष्टÑ पाण्यावर पेटतोय का? पेटविण्याचा प्रयत्न होतोय का? असे मूलभूत व गंभीर प्रश्न आज येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित केले.ते विकासमहर्षी शंकरराव चव्हाण-अप्पासाहेब नागदकर ऋणानुबंध मंचचे उद्घाटन करताना बोलत होते. विंडसर कॅसलमध्ये सायंकाळी झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील होते.वरच्या भागातील सर्वच पक्षांची मंडळी पाणी प्रश्नावर एकत्र असतात. आपणही एकत्र असतो; पण ते दिसत नाही, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे आणि वरच्या भागालाही त्यांचे हक्काचे पाणी मिळायला पाहिजे. पाणीवाटपाचे सूत्र नवीन नाही. आज शेतीला जाऊद्या; पण प्यायला पाणी मिळत नाही, याकडे लक्ष वेधत अशोकराव म्हणाले, जायकवाडी धरण झाले म्हणून चार जिल्ह्यांना तरी पाणी मिळतेय. जायकवाडी भरले की आपण पाणीप्रश्न विसरून जातो; पण देव आणि कोर्ट आपल्याबरोबर आहे; पण हा प्रश्न कुठल्या पक्षाचा नाही. तो व्यापक आहे. आता यापुढे मराठवाड्याने सहनशीलता बाजूला ठेवून सरकार कु णाचेही असो, आवाज बुलंद करण्याची गरज आहे. मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकांनी संघटित होण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी यावेळी साद घातली.मराठवाडा पोरका झाला का? असा सवाल करीत अशोकरावांनी तिकडे चार-चार, सहा-सहा पदरी रस्ते होत आहेत आणि इकडे मराठवाड्यात खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा हेच कळत नाही. आपण सहन करतो म्हणून हे घडतेय. लोकप्रतिनिधींनी विकास खेचून आणला पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला आमचा पाठिंबा राहील.पाणी पेटू नये...पाणी पेटू नये, अशी भावना व्यक्त करीत चव्हाण यांनी नमूद केले की, दोन राज्यांत, दोन विभागांत आणि दोन जिल्ह्यांत पाण्यावरून भांडणे सुरू झालेली दिसत आहेत. याकडे राजकीय दृष्टीने पाहू नये. कारण पाणी सर्वांचेच असते. मराठवाड्याच्या मागासलेपणाचे उच्चाटन अजूनही झाले नाही. अजूनही आपण मागेच आहोत.पुरस्कार वाटपयावेळी खा. चव्हाण यांच्या हस्ते अॅड. प्रदीप देशमुख, रामनाथ चौबे, अब्दुल वाहेदसेठ, उदयसिंग राजपूत, सूर्यकांता गाडे, रवींद्र गाडेकर, प्रा. सुलक्षणा जाधव यांना अप्पासाहेब नागदकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात आले. प्रारंभी, महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नंतर दीप प्रज्वलित करण्यात आले. मिलिंद पाटील, ऋग्वेद पाटील, स्वाती पाटील, जयश्री पाटील, भाऊसाहेब थोरात, आकाश बोलधने, ऋषी नागदकर, दिलीप नागदकर आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार उत्तमसिंग पवार, मधुकरअण्णा मुळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींची उपस्थिती होती. प्राचार्या प्रतिभा पाटील यांनी प्रास्ताविक केले.जायकवाडीचे नाव घेतले की, शंकररावांची आठवण होते...या समारंभात ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांचे अभ्यासपूर्ण भाषण झाले. ते म्हणाले की, जायकवाडीचे आपण नाव घेतो तेव्हा शंकरराव चव्हाण यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नांदेडच्या नगराध्यक्षपदापासून ते उपमंत्री, मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील अनेक महत्त्वाची मंत्रीपदे शंकरराव चव्हाण यांनी भूषवून उत्कृष्ट कामगिरी केली. अप्पासाहेब नागदकर यांनी कन्नड तालुक्यात आमदार असताना भरीव कामे केली. १७१ लघुसिंचन प्रकल्प केले. घाट फोडून रस्ता केला. शैक्षणिक कार्यातही भरारी मारली.या ऋणानुबंध मंचच्या माध्यमातून विकासाचे नाते जपले जाईल. कारण कुठेतरी विकासाची गती कुंठित झालेली दिसून येत आहे. विकासकार्याला या मंचच्या माध्यमातून गती येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या समारंभात माजी मंत्री राजेश टोपे, सूर्यकांता गाडे, सुलक्षणा जाधव व अॅड. भीमराव पवार यांची भाषणे झाली. नंतर ‘मराठवाड्याचा शाश्वत विकास व आव्हाने’ या विषयावर अॅड. प्रदीप देशमुख यांचे स्वतंत्र व्याख्यान झाले.
महाराष्टÑ पाण्यावर पेटतोय का? पेटविण्याचा प्रयत्न होतोय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:29 AM
महाराष्टÑ पाण्यावर पेटतोय का? पेटविण्याचा प्रयत्न होतोय का? असे मूलभूत व गंभीर प्रश्न आज येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित केले.
ठळक मुद्दे अशोकराव चव्हाण यांचे सवाल शंकरराव चव्हाण-अप्पासाहेब नागदकर ऋणानुबंध मंचचे उद्घाटन