औरंगाबाद : ठोक्याची अडीच एकर जमीन. ती कसण्यासाठी बैलजोडीसह अन्य शेती अवजारे खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे वेरूळ शिवारातील एक कास्तकार मुलासह स्वत: बैलाच्या जागी डवऱ्याचा जू आपल्या खांदावर घेऊन शेतीची मशागत करीत आहेत.
बालाजी साहेबराव जोंधळे (४२), असे या मेहनती शेतकऱ्याचे नाव. त्यांचे मूळ गाव औंढा नागनाथ. मजुरीनिमित्त १५ वर्षांपूर्वी ते औरंगाबादेत आले व कसाबखेडा परिसरात राहू लागले. तेथे शेतमजूर म्हणून काम करताना शिवारातील शेती ठोक्याने घेऊन शेती करू लागले. १२ वी उत्तीर्ण झालेला त्यांचा मुलगा विक्रम हादेखील त्यांना शेती कामात मदत करतो.
सध्या त्यांनी या शिवारातील अडीच एकर शेती ७ हजार रुपये प्रतिवर्षाप्रमाणे ठोक्याने घेतली आहे. जोंधळे म्हणाले, शेती स्वत:ची नाही. त्यामुळे अवजारे नाहीत. नांगरणी व वखरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने घेतो. अन्य कामांसाठी अवजारेही भाड्याने घेतो. बैल ठेवणे परवडत नाही. त्यामुळे बैलाची लहानसहान कामे आम्ही दोघे स्वत:च करतो. सध्या शेतात मका असून, त्यात डुबे मारण्याचे काम आम्ही दोघे करीत आहोत. डुबे व कोळपे आम्हीच मारतो. पत्नी व एक मुलगीही मदत करते.