औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १०७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाने प्रतिनियुक्तीवर घेतले होते. या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने कार्यमुक्त केल्यानंतर मंगळवारी आणखी २५३ जणांना प्रतिनियुक्त केले. यामुळे विद्यापीठातील एकूण ४५५ पैकी ३६५ कर्मचारी निवडणूक कामावर असतील. त्यामुळे विद्यापीठात आगामी दीड महिना केवळ ८७ कर्मचारी असतील.
विद्यापीठातील पदवी परीक्षांना १० आॅक्टोबर आणि १ नोव्हेंबरपासून पदव्युत्तर पदवी परीक्षांना सुरुवात होत आहे. परीक्षा काळात ३६५ कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापकांना सक्तीने निवडणूक कामात घेतले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असून, परीक्षा पुढे ढकलण्याचीच शक्यता अधिक आहे. या प्रकारामुळे प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
विद्यापीठात प्राध्यापकांची २५६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११५ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. १४१ पैकी ५ जण निवडणूक कामासाठी कार्यमुक्त झाले . कर्मचाऱ्यांची ७७७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २७७ पदे रिक्तच आहेत. कार्यरत ४८५ पैकी उस्मानाबादेत १५ असून, ५ जण निलंबित आहेत. त्याशिवाय १० कर्मचारी अपंग आहेत. सोमवारी १०७ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले .
तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना बनवले केंद्राध्यक्षनिवडणूक कार्यालयाने दिलेल्या आदेशामध्ये ३६५ अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी ४२ जण तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहेत. या ४२ जणांना केंद्राध्यक्ष म्हणून आदेश प्राप्त झाले आहेत. ४२ पैकी १८ जणांनी यापूर्वी कधीही निवडणुकीचे काम केले नाही. त्यांनाही केंद्राध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर विद्यापीठातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे नेते डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी एवढ्या संख्येने कर्मचारी घेण्याच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले. निवडणुका ज्याप्रमाणे महत्त्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे परीक्षाही महत्त्वाच्या असतात. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे परीक्षेत गोंधळ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.