वाळूज महानगर : गंगापूर- खुलताबाद विधानसभा निवडणुकीत विद्यमान आ. प्रशांत बंब यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. आज बजाजनगरातील एका हॉटेलात सर्वपक्षीय नेत्यांची बंदद्वार बैठक घेण्यात आली. बैठकीत मंथन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी ज्याला मिळेल त्या उमेदवाराच्या पाठीशी पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आ. प्रशांत बंब हे दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप व काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती व आघाडी झालेली आहे. युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपकडे असल्यामुळे भाजपकडून आ. बंब यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. भाजपला जागा सुटल्यामुळे शिवसेनेच्या दावेदारांमध्ये चलबिचल सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी युवा सेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
या प्रकाराची कुणकुण लागताच राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार डॉ. ज्ञानेश्वर पा. नीळ यांनी मुंबईत शरद पवारांसह मातब्बर पदाधिकाऱ्यांची भेट घेत निष्ठावान कार्यकर्त्यांलाच उमेदवारी द्यावी, अशी गळ घातली होती. या जागेचा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपसात तडजोड करून कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय या दावेदारांवर सोपविला होता. विशेष म्हणजे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आ. हर्षवर्धन जाधव व कृष्णा पा. डोणगावकर यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन कन्नड व गंगापूरची जागा शिव स्वराज्य पक्षाला सोडण्याची मागणी केली होती. मात्र, शरद पवार यांनी या दोघांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या दोघांनी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
बजाजनगरात झालेल्या बैठकीला माजी आ. अण्णासाहेब माने पाटील, कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव, गंगापूर साखर कारखान्याचे माजी चेअरमन कुंडलिकराव पा. माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, युवा सेनेचे संतोष माने, सेनेचे जिल्हा उपप्रमुख कृष्णा पा. डोणगावकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पा. नीळ, किरण पा. डोणगावकर, दिलीप पा. बनकर, शिवाजीराव पा. बनकर, गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव, विश्वजित पा. चव्हाण, शेकापचे महेश गुजर, पत्रकार संजय वरकड, प्रा. रवींद्र बन्सोड, योगेश शेळके आदींसह सर्वपक्षीय नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सर्वांनी सोबत राहण्याचा निर्णयबजाजनगरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी आ. बंब यांच्या विरोधातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बंदद्वार बैठक घेण्यात आली. बैठकीत आ. प्रशांत बंब यांना रोखण्यासाठी रणनीती ठरविण्यात आली. पक्षीय भेदाभेद दूर ठेवून आ. बंब यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सर्वांनी सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगापूर तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, युवा सेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने व सेनेचे जिल्हा उपप्रमुख कृष्णा पा. डोणगावकर या तिघांपैकी ज्या कुणाला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होईल, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
माझ्या शुभेच्छा -आ. प्रशांत बंबबजाजनगरात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आल्याची माहिती आपणास मिळाली आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मतदारसंघात आपण केलेल्या विकासकामांमुळे तसेच आपल्याला मतदारसंघात मिळत असलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे विरोधक हवालदिल झाले असल्याचे आ. प्रशांत बंब यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.