औरंगाबाद : भारतीय जनता पक्ष ज्या घटनेच्या आधारावर चालतो. त्यामध्ये कोठेही ७५ वय झालेल्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी नोंद करण्यात आलेली नाही. जो मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. जनतेची सेवा करू शकतो. त्यांना उमेदवारी देण्यात येते. त्यामुळे येत्या ३ आॅक्टोबर रोजी फुलंब्री मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजपने लोकसभा निवडणुकीत ७५ पेक्षा अधिक वय झालेल्या व्यक्तींना उमेदवारी नाकारली होती. याची पुनरावृत्ती राज्य विधानसभा निवडणुकीत केली जाणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे ७५ मध्ये असलेले विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी कापण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहिलेले हरिभाऊ बागडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या घटनेत कोठेही ७५ वर्षे वय झालेल्या व्यक्तींनी निवडणूक लढवू नये, असे नमूद केलेले नसल्याचे स्पष्ट केले.
७५ वर्षे वय झाल्यानंतर उमेदवारी नाही, हा दावाच चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. उलट वयापेक्षा जो व्यक्ती मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. जनतेची कामे करू शकतो, अशा व्यक्तींना उमेदवारी पक्ष नाकारू शकत नाही, असे सांगितले. विधानसभाध्यक्षांच्या या दाव्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा चुकीचा ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘पक्षाची की स्वत:ची’ उमेदवारीवर मौनविधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ३ आॅक्टोबर रोजी फुलंब्री मतदारसंघातून वाजत-गाजत उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी की पक्षाची उमेदवारी? असा प्रश्न उपस्थित केला असता पक्षाची उमेदवारी दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर आपणाला उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न केला असता, पक्ष याविषयी निर्णय घेईल, अशी पुस्तीही जोडली. यामुळे हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीविषयी त्यांनाच संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले.