औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड घेतल्यानंतर स्वबळाची तयारी सुरू केली आहे. एमआयएमने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत तीन उमेदवारांचा समावेश होता.
एमआयएम विधानसभेच्या किमान ६० जागा लढविणार आहे. मागील आठ दिवसांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरासाठीही मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतींचा कार्यक्रम ७० टक्के पूर्ण झाला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. जिथे एमआयएम पक्षाचे संघटन आहे, नागरिकांचा प्रतिसाद आहे, त्या ठिकाणी उमेदवार टाकण्याची रणनीती पक्षाने आखली आहे.
एमआयएमची पहिली यादी १० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पुण्याच्या वडगाव शेरी येथून डॅनियल रमेश लांडगे, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मुफ्ती मोहंमद इस्माईल, नांदेड (उत्तर) मधून मोहंमद फेरोज खान (लाला) यांची नावे जाहीर झाली होती. दुसऱ्या यादीत चार जणांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून अॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मोहंमद शाहबदी, सोलापूर दक्षिणमधून महिला उमेदवार देण्यात आल्या आहेत. सोफिया तौफिक शेख या उमेदवार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट येथून हिना शफिक मोमीन यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये एमआयएमने दोन याद्या जाहीर करून आघाडी घेतली आहे. इतर पक्षांनी अद्याप यादीच जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांची बरीच दमछाक होत आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघात एमआयएम पक्षाने विजय मिळविला होता. या मतदारसंघात सर्वाधिक ३० जण इच्छुक आहेत. येथील उमेदवारीचा निर्णय हैदराबाद येथे पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी घेणार आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुकांचे डोळे सध्या हैदराबादकडे लागून आहेत. यादीत नाव असावे यासाठी जोतो जोरदार प्रयत्न करतो आहे.