राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सिल्लोड’वर डोळा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:14 PM2019-09-23T17:14:18+5:302019-09-23T17:17:08+5:30
राष्ट्रवादीच्या रंगनाथ काळेंना शरद पवार यांचे आशीर्वाद
सोयगाव : औरंगाबादेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी रंगनाथ काळे यांना आशीर्वाद दिल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
१९९९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून सोयगाव तालुक्यातील काँग्रेसचे उमेदवार रंगनाथ काळे यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी झालेल्या चौरंगी लढतीत रंगनाथ काळे यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने अप्पासाहेब बाबूरावजी काळे यांचा वारसा पुढे नेणाऱ्या रंगनाथ काळे यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे रंगनाथ काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, त्यानंतरही सिल्लोड- सोयगाव हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला. अलीकडे अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. परिणामी, या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात सिल्लोड- सोयगाव हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांना आशीर्वाद दिला व यासंदर्भात दोन्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे बोलले जाते.
सिल्लोड-सोयगावमध्ये बंडखोरी होणार नाही
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोेडल्यास सध्या काँग्रेसचे दावेदार प्रभाकर पालोदकर हे रंगनाथ काळे यांच्या पाठीशी राहतील. हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिल्यास रंगनाथ काळे हे प्रभाकर पालोदकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, असे या नेत्यांमध्ये अगोदरच ठरले आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही, हे यामुळे स्पष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी समन्वयाचा हा निर्णय विजयाच्या मार्गावर नेणारा ठरणार आहे.