- शांतीलाल गायकवाड
औरंगाबाद : भाषावार प्रांतरचनेचे सूत्र मान्य होऊनही महाराष्ट्र व गुजरात मिळून मुंबई हे द्विभाषिक राज्य स्थापन झाले. १९५७ मध्ये झालेल्या या निवडणुकीपूर्वी हैदराबाद राज्यातील मराठवाडा व मध्यप्रदेशातील विदर्भ, गुजरात व सौराष्ट्र वेगळे काढून मुंबई राज्याला जोडले गेले. ३३९ आमदारांच्या या विधानसभेत मराठवाड्यातून तीन महिला आमदारांना जाण्याची संधी मिळाली. १९५२ च्या पहिल्याच निवडणुकीत वैजापुरातून विजयी झालेल्या आशाताई आनंदराव वाघमारे यांना मात्र दुसऱ्य निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले.
नव्यानेच स्वतंत्र झालेल्या भारतात या काळात राज्यनिर्मितीची प्रक्रिया वेगात होती. फाजल अली आयोगाने केलेल्या सूचनांनुसार भाषावार प्रांतरचना करण्याचे सूत्र स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार मराठी भाषा बोलणाऱ्य मराठवाडा व विदर्भाला मुंबई राज्याला जोडण्यात आले. त्यामुळे दुसऱ्य निवडणुकीनंतर औरंगाबादसह मराठवाड्यातील आमदारांना हैदराबादऐवजी मुंबई विधानसभेत समाविष्ट करण्यात आले.
औरंगाबाद शहरातून काँग्रेसचे मीर महमूद अली यांना मतदारांनी मुंबई राज्याच्या विधानसभेत पाठविले. पीजंट वर्कर्स पार्टीचे काजी सलिमोद्दीन यांचा मीर महमूद यांनी पराभव केला होता. तेव्हा औरंगाबाद शहराचे एकूण मतदार होते फक्त ५२ हजार १७५. त्यातील १६ हजार ६८७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. मीर महमूद यांना १० हजार ४७५ मते मिळाली.
विद्यमान दोन आमदार पराभूत, एक विजयीमराठवाडा हैदराबाद राज्यात समाविष्ट असताना १९५२ मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक झाली. तीत कन्नड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रामगोपाल रामकिसन नावदार हे विजयी झाले होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसरी निवडणूक नावदार यांनी काँग्रेसच्याच तिकिटावर गंगापूर मतदारसंघातून लढविली; परंतु सीपीआयचे दिगंबरदास चंद्रगुप्ता यांनी त्यांचा केवळ ६१ मतांनी निसटता पराभव केला होता. याचप्रमाणे काँग्रेसच्या आशाताई वाघमारे यांचा पीएसपीचे रामचंद्र महिंद्रनाथ यांनी १९११ मतांनी पराभव केला. नागोराव विश्वनाथराव पाठक यांनी मात्र सतत दुसऱ्यंदा विजय मिळविला. ते दोन्ही वेळेस काँग्रेसच्या उमेदवारीवर सिल्लोड मतदारसंघातून लढले होते. सतत दुसऱ्यंदा आमदारकीचा मान मिळविणारे ते जिल्ह्यातून पहिले आमदार ठरले.
औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार : १९५७विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार पक्ष प्राप्त मतेऔरंगाबाद मीर महमूद अली काँग्रेस १०४७५पैठण व्यंकटराव जाधव काँग्रेस १२२१३गंगापूर दिगंबरदास चंद्रगुप्ता सीपीआय १००५५वैजापूर महेंद्रनाथ रामचंद्र पीएसपी १४९१८कन्नड बाबूराव माणिकराव काँग्रेस ११५६९सिल्लोड नागोराव विश्वनाथ पाठक काँग्रेस १२५९८ जालना (राखीव) धोंडिराम गणपतराव काँग्रेस १९९२६जालना (सर्वसाधारण) रुस्तुमजी बेजॉनजी काँग्रेस १७९९०अंबड नाना जेधे काँग्रेस ११२३०भोकरदन भगवंतराव गाडे काँग्रेस १४१६१
मराठवाड्यातील महिला आमदारमराठवाड्यातून ४ महिलांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. काँग्रेस वगळता अन्य एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नव्हती, हे विशेष. चारपैकी तिघी विजयी झाल्या. त्यात शांताबाई रतनलाल (बीड), ताराबाई मानसिंग (कळंब- एससी राखीव) व अंजनाबाई जयवंतराव (हादगाव) यांचा समावेश होता. वैजापूरच्या तत्कालीन आमदार आशाताई आनंदराव वाघमारे यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला. मुंबई द्विभाषिक राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत ५५ महिला उमेदवार होत्या. त्यातील २२ उमेदवार विजयी झाल्या.