औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीचा शंख वाजताच प्रमुख राजकीय पक्षांनी मतदारसंघ काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने बालेकिल्ला म्हणून अनेक वर्षे अधिराज्य गाजवले. अत्यंत नवख्या एमआयएम पक्षाने २०१४ मध्ये सेनेचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत आपला झेंडा लावला. सेनेने यंदा हा बालेकिल्ला परत हिसकावून घेण्यासाठी चंग बांधला आहे. या मतदारसंघात पाच वर्षांमध्ये राजकीय ताकद वाढविण्याचे काम भाजप, एमआयएम, शिवसेनेने केले आहे. सर्वात जास्त नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र, हा मतदारसंघ युतीत भाजपकडे नाही.
विधानसभा निवडणूक म्हटली की, कोणत्या पक्षाचे नगरसेवक सर्वाधिक आहेत, यावर राजकीय गणिते अवलंबून असतात. मध्य विधानसभा मतदारसंघात सध्या एमआयएमचे ११ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ सेनेचे अपक्षांसह १० नगरसेवक आहेत. भाजपने या मतदारसंघात पाच वर्षांमध्ये बरीच मुसंडी मारली आहे. २०१० मध्ये भाजपचे फक्त चार नगरसेवक होते. आता ही संख्या ११ पर्यंत पोहोचली आहे. दोन स्वीकृत सदस्यही आहेत. पाच वर्षांमध्ये भाजपने इनकमिंगवर भर दिला. माजी नगरसेवकांचीही फौज उभी केली. दुर्दैवाने हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडे नाही. युती तुटल्यास स्वबळाची वेळ आल्यास हा फौजफाटा कामाला येईल, असा विचार भाजपने केला आहे. मध्य मतदारसंघात चार अपक्षही आहेत.या अपक्षांचा कौलही महत्त्वपूर्ण आहे. त्यातील एक अपक्ष कीर्ती शिंदे स्वत: नशीब अजमावत आहेत. सेनेचे २००४ मध्ये ११ नगरसेवक होते. अपक्षांसह आज ही संख्या १० आहे. सेनेने पाच वर्षांत इनकमिंगवर कधीच लक्ष दिले नाही. उलट सेनेचे माजी नगरसेवक पक्ष सोडून भाजपमध्ये गेले.
एमआयएमसमोर आव्हान कोणते?जावेद कुरैशी बंडाच्या तयारीत आहेत. हे बंड थोपविणे एमआयएम पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडी अमित भुईगळच्या माध्यमाने उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कदीर मौलाना यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविण्याच्या तयारीत आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे थांबविणे एमआयएम पक्षाला सोपे नाही.
सेनेचे दहा वर्षांपासून दुर्दैव२००९ मध्ये मध्य विधानसभा मतदारसंघात सेनेचे ज्येष्ठ नेते प्रदीप जैस्वाल यांनी बंड केले. त्यांनी स्वतंत्र शहर प्रगती आघाडी स्थापन करून अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी सेनेचे उमेदवार विकास जैन यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये सेनेने जैस्वाल यांना पक्षात घेऊन तिकीट दिले. याचवेळी भाजपनेही स्वबळाच्या माध्यमातून किशनचंद तनवाणी यांना उभे केले. मत विभाजनाचा पूर्ण फायदा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीतही जलील यांनी या मतदारसंघातून ९९ हजार मतदान घेतले होते.
२०१९ लोकसभेची मध्यमधील स्थितीइम्तियाज जलील 99,450 चंद्रकांत खैरे 50,327हर्षवर्धन जाधव 30,210
२००९ मध्ये मध्यची स्थितीउमेदवार एकूण मतेप्रदीप जैस्वाल ४९,९६५अ. कदीर मौलाना ४१,५८१विकास जैन ३३,९८८
२०१४ मध्ये मध्यची स्थितीउमेदवार एकूण मते इम्तियाज जलील ६१,८४३ किशनचंद तनवाणी ४०,७७०प्रदीप जैस्वाल ४१,८६१विनोद पाटील ११,८४२