विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीरव महाराष्ट्रातील राजकीय पारा चढताना दिसत आहे. नेतेमंडळींच्या आरोप प्रत्यारोपांनाही धार येऊ लागली आहे. यातच छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद पच्छिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, शिवसेना ठाकरे गटावर एमआयएमसोबत सेटलमेंटचा गंभीर आरोप करत आणि "वारे उबाठा तुझं हिंदुत्व...!" असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
महत्वाचे म्हणजे, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी येते शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना, असा सामना होत आहे. चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे यांना उभे करून उद्धवसेनेने आव्हान दिले आहे.
"लाज वाटायला हवी यांना लाज..." -शिरसाट म्हणाले, "माझीही फाइट एमआयएमबरोबरच आहे. कारण माझ्याकडे उबाठा गटाचा उमेदवार नाही, तर तो एमआयएमचा उमेदवार आहे. निवडणुकीत काय काय कॉम्प्रमाईड होतात..., हे मी बघत आहे. माझ्याकडचा उमेदवार बोलला, इकडचा जो उमेदवार आहे, 'तुम्ही तिकडे उभे राहा, आमची मते तिकडे देऊन टाकू आणि तुमची मते मला देऊन टाका.' लाज वाटायला हवी यांना लाज."
वारे उबाठा तुझं हिंदूत्व...! हे हिंदूत्व असतं...? याला म्हणतात हिंदुत्व...? -पुढे शिवसेना ठाकरे गटावर संताप व्यक्त करत शिरसाट म्हणाले, "शहरामध्ये काय चाललंय? ठरवून करत आहेत ठरवून. आमचे दोन आहेत, ते तुम्ही निवडून आणा, आम्ही तुमचे निवडून आणतो. वारे उबाठा तुझं हिंदूत्व...! हे हिंदूत्व असतं...? याला म्हणतात हिंदुत्व...? आरे मतासाठी एवढी लाचारी पत्करायची असेल..., अरे आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निवडून देतो. पण गुडघे टेकू नका रे गुडघे टेकू नका...!"