औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला वाळूज एमआयडीसीमध्ये हिंसक वळण लागले. आंदोलकांनी तीन ते चार कंपन्यांच्या सुरक्षारक्षकांच्या केबिन फोडून तेथील सामानाची आणि वाहनांची तोडफोड केली. तसेच आंदोलकांना शांततेचे आवाहन करणाऱ्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक करून पोलिसांची एक गाडी जाळली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्र ांती मोर्चाने आज आॅगस्ट क्रांती दिनी राज्यव्यापी बंद पुकारला होता. एकीकडे संपूर्ण शहरात शांततेत बंद आणि रास्ता रोको सुरू असताना दुसरीकडे वाळूज एमआयडीसीमध्ये दुपारच्या सत्रात आंदोलनाला गालबोट लागले.
कंपन्यांमध्ये केली तोडफोड वाळूज एमआयडीसीमधील कॅनपॅक कंपनीवर आंदोलकांनी हल्लाबोल केला. यात कंपनीच्या सुरक्षारक्षकांची केबिन आणि आतील विभागाची तोडफोड केली. तेथील अधिकाऱ्यांच्या चार कार जमावाने फोडल्या. सर्व कामगारांना कंपनीतून बाहेर काढले. त्यानंतर आंदोलक घोषणाबाजी करीत वोखार्ड कंपनीत घुसले तेथील सुरक्षा रक्षकांच्या केबिन आणि कॅटींनची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर गरवारे कंपनीच्या सुरक्षारक्षकाची केबिनचे नुकसान केले.
पोलीस आयुक्तांच्या गाडीवर दगडफेकवाळूज एमआयडीसीमध्ये तणाव झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे तेथे दाखल झाले. यावेळी समोर उभा असलेल्या दोन हजाराहून अधिक लोकांच्या जमावाने केलेल्या दगडफेकीत त्यांच्या कारच्या काचा फुटल्या.
तीन पोलीस कर्मचारी जखमीजमाव एका खाजगी बसची तोडफोड करीत असल्याचे पाहून त्यांना अडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही त्यांनी दगडफेक केली. या घटनेत पोलीस कर्मचारी वसंत शेळके, सुखदेव भागडे आणि जय साळुंके हे जखमी झाले.
बजाज कंपनीसमोर ठिय्याबंदच्या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी बजाज अॅटो कंपनीने मात्र कंपनी सुरू ठेवल्याची माहिती आंदोलकांना कळाली. यामुळे पहाटे पाच वाजताच आंदोलक कंपनीच्या गेटवर ठिय्या दिला. सकाळच्या शिफ्टचे कामगार बसमधून उतरताच आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना पिटाळून लावले. यात काही कामगार जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन पत्रकारांना मारहाणवाळूज एमआयडीसीमध्ये वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना आंदोलकांनी मारहाण केली. यात एक जण बेशुद्ध झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.