औरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनात व्यापारी स्वत:हून सहभागी झाले होते. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचे शटर गुरुवारी उघडलेच नाही. याचा मोठ्या प्रमाणात फटका शहराला बसला. विशेषत: येथील हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, पर्यटनाच्या व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे. यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील ९९ टक्के बाजारपेठ बंद होती.
सरकारी तिजोरीत कर भरण्याच्या आकडेवारीचे गणित केल्यास जिल्ह्यातील बाजारपेठेत सध्या दररोज ४०० कोटींची उलाढाल होत आहे. या एकूण उलाढालीपैकी शहरातील व्यवसायाचा २५० ते २७५ कोटींचा वाटा असतो. जर एक दिवस बाजारपेठ बंद राहिली तर जिल्ह्यात ४०० कोटींचे व्यवहार ठप्प होतात. यात जाधववाडी, मोंढा, आॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, कपडा बाजार, सराफा बाजार यासारख्या व्यवसायाचा समावेश आहे.
पेट्रोलपंपांचे ५ कोटींचे व्यवहार ठप्प गुरुवारी शहरातील व आसपासच्या परिसरातील ३५ पैकी ३० पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. या काळात अवघे ५ पेट्रोलपंप सुरू होते. मात्र, दुपारनंतर आंदोलनकर्त्यांनी यातील ३ पेट्रोलपंप बंद करायला भाग पाडले होते. सायंकाळी काहीच पेट्रोलपंप सुरू झाले होते. यासंदर्भात पेट्रोलपंपचालक असोसिएशनचे हितेश पटेल यांनी सांगितले की, पहिल्यांदाच शहरातील पेट्रोल कंपन्यांचे स्वत:चे पेट्रोलपंप बंद होते. शहरात दररोज ३ लाख लिटर पेट्रोल तर दोन लाख लिटर डिझेलची विक्री होते. व्यवस्थापनावरील खर्च, असे ५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
हॉटेल उद्योगाला फटका औरंगाबाद जिल्हा हॉटेल्स रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मगर यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे १७२ सदस्य आहेत. तसेच अन्य मिळून शहरात लहान-मोठे २५० हॉटेल रेस्टॉरंट, लॉज आहेत. एका दिवसात दीड कोटीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. बंदचा परिणाम येणारा आठवडाभर दिसून येईल.
८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्प बँकेतील सुमारे ८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. चित्रपटगृहांनाही आर्थिक फटका बसला. यासंदर्भात चित्रपटगृहाचे मालक रवी खिंवसरा यांनी सांगितले की, शहरात मल्टिप्लेक्स व सिंगल चित्रपटगृहांचे २७ स्क्रीन आहेत. या चित्रपटगृहांतील सर्व शो रद्द करण्यात आले होते. त्यामुळे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. खाद्यपदार्थांपासून ते पार्किंगपर्यंत विविध व्यवसायालाही तेवढाच फटका बसला. असा एकूण ५० लाख रुपयांचा फटका बसला आहे.