शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Maharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीत दमबाजी, दहशत आणि भयकारी घटनांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:31 PM

सुमारे चार हजारांहून अधिक उद्योग आणि पन्नास हजार नागरिकांचा रोजगार अवलंबून असलेल्या वाळूज औद्योगिकनगरीवरील हल्ला हा नियोजनबद्धपणे करण्यात आल्याचे समोर येत आहे. 

ठळक मुद्देबंद दरम्यान कंपन्यांवर नियोजनबद्ध हल्ला  हल्लेखोरांनी चेहरा झाकून सुरक्षा कार्यालये, सीसीटीव्ही फोडलेकंपन्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण

- राम शिनगारे  

औरंगाबाद : स्थळ : कॅनपॅक कंपनी.  वाळूज औद्योगिक वसाहत. वेळ : दुपारी १२ वाजताची. कंपनीच्या गेटला लागून असलेल्या केबिनमध्ये तीन सुरक्षारक्षक आपली ड्यूटी करताहेत. इतक्यात सुमारे चाळीस ते पन्नास तरुणांचा एक घोळका दुचाकीवरून गेटसमोर आला. ‘दहा मिनिटांत कंपनी बंद करा’, अशी दमबाजी करत हे टोळके निघून गेले. दुपारी एक वाजता पुन्हा तेच टोळके आले. मात्र, यावेळी साठ ते सत्तर जण होते. पुन्हा तशीच दमबाजी करून निघून गेले. ३ वाजून २० मिनिटांनी मात्र चारशे ते पाचशे जणांचा जमाव आला. या जमावाने थेट दगडफेक सुरू केली. चेहरा झाकलेल्या युवकांनी सीसीटीव्ही फोडले. कंपनीतील चेअरमन केबिनच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर कंपनीत मोठा धुडगूस घातला. सुरक्षारक्षकही काही करू शकले नाहीत...

औद्योगिक वसाहतीमधील गुरुवारची ही एक भयकारी घटना. यासारख्या अनेक घटनांची मालिकाच घडून आली. अनेक कंपन्यांमध्ये तोडफोडीचा असाच प्रकार घडला. त्या कंपन्यांमधला अनुभवही ‘कॅनपॅक’सारखाच होता. लोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी वाळूज औद्योगिक परिसरातील तोडफोड झालेल्या कंपन्यांना भेट देऊन हल्ल्याची माहिती घेतली. सुमारे चार हजारांहून अधिक उद्योग आणि पन्नास हजार नागरिकांचा रोजगार अवलंबून असलेल्या वाळूज औद्योगिकनगरीवरील हल्ला हा नियोजनबद्धपणे करण्यात आल्याचे समोर येत आहे.  

गुरुवारी (दि.९) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये कंपन्यांनाच टार्गेट करण्यात आले. बंदमुळे अनेक कंपन्याही बंद होत्या. काही कंपन्यांचे शटडाऊन करणे शक्यच नसल्यामुळे त्या सुरू होत्या. त्यातही अत्यावश्यक विभाग सुरू होते. मात्र दुपारी ३ वाजेनंतर ५०० ते ६०० लोकांचा जमाव असलेल्या झुंडीच्या झुंडी मुख्य रस्त्यांवरून फिरू लागल्या. या जमावाने मुख्य रस्त्यावरील बजाज आॅटो लिमिटेड कंपनीपासून तोडफोडीला सुरुवात केली. यानंतर कोलगेट, कॉसमॉस, स्टरलाईट, श्रेया इंजिनिअर्स, आकार टूल्स, मॅनडिझेल, एनआरबी, सिमेन्स, मायलन, एन्डुरन्स, नहार इंजिनिअर्स, कॅनपॅक आणि वोक्हार्ट, सुपरमॅट अ‍ॅण्ड बोर्ड, कुबेरा इनोव्हेटिव्ह या कंपन्यांना ओळीने टार्गेट करण्यात आले. हल्ला करणाऱ्या जमावाच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी नियोजनबद्धपणे हल्ला केल्याचे विविध कंपन्यांच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले.

सीसीटीव्ही यंत्रणा फोडली

हल्लेखोरांनी सुरुवातीला प्रवेशद्वारावर असणाऱ्या सुरक्षा कार्यालयांना लक्ष्य करून सीसीटीव्ही यंत्रणा फोडली. सीसीटीव्हीत सुुरुवातीचे चित्रण झालेले असल्यामुळे सुरक्षारक्षकांच्या कार्यालयात असलेले संगणक फोडून पुरावा नष्ट केला. यानंतर कंपनीत घुसखोरी करून गाड्या, काचेची तावदाने यांना लक्ष्य केले. स्टरलाईट, सिमेन्स, एन्डुरन्स, एनआरबी या नामांकित कंपन्यांमध्ये घुसखोरी करून कोट्यवधींचे नुकसान करण्यात आले. याशिवाय इतर लघु कंपन्यांमध्येही विविध टोळक्यांनी धुडगूस घालून तोडफोड केल्याचे दिसून आले.

‘स्टरलाईट’मध्ये महिला कर्मचाऱ्यांना हॉलमध्ये बसविलेस्टरलाईट कंपनीचे फ्रंट आॅफिस फोडून हल्लेखोर आतमध्ये घुसले. हल्लेखोरांचा प्रचंड जमाव असल्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण दिसेल त्या मार्गाने पळू लागला. महिला कर्मचारी प्रचंड घाबरल्या होत्या. तेव्हा एका अधिकाऱ्याने सर्व महिला कर्मचाऱ्यांना एका हॉलमध्ये जमा करून बाहेरून कुलूप लावून घेतले. या कंपनीतील गॅसचा टँक हा अतिशय महाकाय आहे. या टँकला कोणत्याही प्रकारची इजा झाली असती तर किमान दहा किलोमीटर परिसर संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कंपनीच्या अधिकृत नुकसानीसंदर्भात बोलण्यास एकाही अधिकाऱ्याने तयारी दर्शविली नाही.

‘एनआरबी’ च्या बेअरिंग्ज रस्त्यावर आणून जाळल्यानामांकित ‘एनआरबी’ कंपनीच्या प्रवेशद्वारावर पाच सुरक्षारक्षक तैनात होते. कंपनीला सुटी दिली असल्यामुळे कर्मचारी नव्हते. तोंड बांधून, हेल्मेट घालून आलेल्या तीन-चार हल्लेखोरांनी सुरुवातीला सीसीटीव्ही फोडून टाकले. त्यानंतर सुरक्षा आणि मनुष्यबळ विकास विभागाच्या कार्यालयातील संगणकांना लक्ष्य केले. काही वेळात मोठा जमाव आला. या हल्लेखोरांनी कंपनीचे पॅनल ग्लास फोडून टाकले. कंपनीत प्रवेश केल्यानंतर काचा, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. गोडाऊनमध्ये असलेले बेअरिंग्जचे बॉक्स बाहेर आणून कंपनीच्या प्रवेशद्वारावरच जाळले.याच वेळी सुरक्षारक्षकांनी हात जोडून विनंती करून शेजारीच महाकाय प्रोपेन टँक असून, त्याकडे जळणारी वस्तू गेल्यास स्फोट होऊन सर्वच जण मरतील, असे सांगिल्यानंतर हल्लेखोरांनी मॅनडिझेल कंपनीकडे मोर्चा वळविला. या तोडफोडीत कोट्यवधींचे नुकसान झाले असून, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या नुकसानीचा उल्लेख केला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‘सिमेन्स’मध्ये सर्वाधिक नुकसानजर्मनीत मुख्यालय असलेल्या ‘सिमेन्स’ या आंतरराष्ट्रीय कंपनीचे प्रचंड नुकसान केले आहे. प्रवेशद्वारावरून उड्या घेत आंदोलक आतमध्ये शिरले. फ्रंट आॅफिस फोडल्यानंतर समोरच असलेल्या पार्किंमधील शेकडो गाड्यांची तोडफोड केली. यानंतर हल्लेखोरांनी मशिनरी असलेली कार्यालये, आॅफिसचे प्रचंड नुकसान केले. यातही स्फोटक रसायने असलेले टँक सुदैवाने सुरक्षित राहिल्याचे उपस्थितांनी सांगितले. या तोडफोडीची पाहणी करण्यास किंवा बोलण्यासही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.

‘एन्ड्युरन्स’चे कॉर्पोरेट आॅफिस उद्ध्वस्त‘एनआरबी’च्या शेजारील ‘एन्ड्युरन्स’ कंपनीच्या दोन्ही प्लँटला लक्ष्य करण्यात आले. हल्लेखोरांकडे कंपनीत प्रवेश करण्यापासून ते कॉर्पोरेट आॅफिसमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची इत्थंभूत माहिती होती. एम.डीं.च्या कार्यालयात शिरत लॅपटॉप, काचा फोडण्यात आल्या. कॉर्पोरेट आॅफिसमधील एकही संगणक सोडले नाही. या प्लँटमधील स्फोटक गॅसच्या टँक सुरक्षित राहिले.

‘कॅनपॅक’च्या चेअरमनच्या खुर्चीला लागला दगड आंतरराष्ट्रीय कंपनी असलेल्या कॅनपॅक इंडिया प्रा. लिमिटेडच्या चेअरमन यांचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे. रस्त्यावरून भिरकावलेला दगड, काच फोडून थेट चेअरमनच्या खुर्चीला लागल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हल्लेखोर तीन टप्प्यांमध्ये आले.  जमाव एवढा प्रक्षुब्ध होता की, आतमध्ये असणारे कर्मचारी जीव मुठीत धरून बसले होते. विशेष म्हणजे कंपनीत केवळ पाच कर्मचारीच उपस्थित होते. दगडफेक जोरात सुरू असतानाच पोलिसांना कळविले. पोलीस सुरुवातीला तासभर आलेच नाहीत. तोपर्यंत कंपनीचा समोरचा भाग पूर्णपणे उद्व्धस्त केला होता. कंपनीसमोर पोलीस पोहोचताच त्यांची गाडी आंदोलकांनी जाळून टाकली. 

कर्मचाऱ्यांनी आतमध्ये शिरण्याचे सर्व दरवाजे बंद केल्यामुळे हल्लेखोरांनी समोरच्या भागालाच टार्गेट केले. जर हे आंदोलक आतमध्ये शिरले असते, तर वर्कशॉपमध्ये असलेल्या ६०० डिग्री सेल्सिअसची ऊर्जा निर्माण करणाऱ्या सिलिका टँकला दुर्घटना झाली असती. या दुर्घटनेमुळे वाळूज महानगर बेचिराख झाल्याचे पाहायला मिळाले, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  एकदा सिलिका टँक सुरू केल्यास साडेआठ वर्षे तो बंद करता येत नाही. तो बंद केल्यास पूर्ववत ऊर्जा निर्माण करण्यासाठी तब्बल ४२ दिवस लागतात, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

इंजेक्शनसुद्धा फोडलेएनआरबी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच मेडिसीन ठेवण्यासाठी एक फ्रीजर होते. यात कंपनीने विविध प्रकारचे उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधी ठेवलेली होती. यातील एक इंजेक्शन माझ्या गरोदर असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी आठ दिवसांपूर्वी आॅर्डर देऊन विमानाने मागविले होते. हल्लेखोरांनी ते फ्रीजरच फोडून टाकले.  यात माझ्या गरोदर पत्नीला त्या इंजेक्शनची कधीही गरज पडू शकते. ते मिळाले नाही तर दुर्दैवी घटनाही घडू शकते. या संभाव्य घटनेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल एनआरबी कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

हल्लेखोरांना कंपन्यांची इत्थंभूत माहितीवाळूज एमआयडीसी भागात कंपन्यांवर केलेल्या हल्ल्यात हल्लेखोरांकडे प्रत्येक कंपनीची इत्थंभूत माहिती होती. सीसीटीव्ही कोठे आहे, आतमध्ये कोणत्या ठिकाणी कोणते कार्यालय आहे, कोणत्या मार्गाने गेल्यास आतमध्ये शिरता येईल याची सर्व सूक्ष्म माहिती हल्लेखोरांकडे होती. तोडफोड करण्यासाठी लोखंडी रॉड, टॉमी, दंडुके आणि अगदी दगडही हल्लेखोरांनी आणले होते. तोंडावर रुमाल बांधलेली अल्पवयीन मुले हिंदी भाषेतून संभाषण करीत होती. यातील अनेक जण दारू पिलेले असल्याचेही दिसून आल्याचे ‘कॅनपॅक’ कंपनीचे अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी सांगितले.

नुकसानीनंतर पोहोचले पोलीसमुख्य रस्त्यावर असलेल्या एक-एक कंपन्यांवर हल्ले करण्यात येत होते. एक कंपनी फोडल्यानंतर पुढील कंपनीकडे धाव घेतली जात होती. प्रत्येक कंपन्याचे सुरक्षारक्षक, अधिकारी पोलिसांना पोहोचण्याची विनंती करीत होते. पोलिसांच्या कंट्रोलरूममधून उद्धटपणाचे शब्द ऐकावे लागल्याचे अनेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एनआरबी कंपनीवर हल्ला सुरू असताना वाळूज पोलिसात फोन केला असता, पुन्हा फोन करू नका, अशा सूचना मिळाल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. एक कंपनी फोडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचत होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याची माहितीही सुरक्षारक्षकांनी दिली.

प्रत्येक कंपनीत सन्नाटावाळूज एमआयडीसीतील प्रत्येक कंपनीत सन्नाटा असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक कंपन्यांमध्ये झालेल्या नुकसानीमुळे उत्पादन बंद होते. शुक्रवारी अनेक कंपन्यांना अधिकृत सुटी असते. मात्र तोडफोडीच्या घटनेमुळे सर्व अधिकारी कंपन्यांमध्ये उपस्थित होते. झालेल्या नुकसानीची गोळाबेरीज करण्यात येत होती. एमआयडीसीचे अधिकारी कंपन्यांना भेट देत होते. पोलिसांना पंचनामा करण्यासाठी कंपन्यांचे अधिकारी बोलवत होते. मात्र आज वेळ नसल्याचा निरोप पोलिसांकडून मिळत होता. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी पूर्णपणे कोलमडून, आत्मविश्वास गमावून बसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते., आताच असे कसे झाले? हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी दिसून आला.