औरंगाबाद : शहर- जिल्हा काँग्रेस या नावाने वर्षानुवर्षे चालत आलेल्या औरंगाबादचीकाँग्रेस आता पुरती खिळखिळी बनली आहे. वाद-विवाद, गट-तट व मत-मतांतरांमुळे गाजत राहणे हे वैशिष्ट्य राहिलेली ही काँग्रेस विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत बेदखल झाली आहे. एक प्रकारची गळतीच लागली असून, कार्यकर्ते या पक्षात काम करायला तयार नाहीत. या दारुण अवस्थेला जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. विद्यमान शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नियुक्तीपासूनच तक्रारी होत्या. आता तर त्या खूपच वाढल्या आहेत.
एकतर ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आहेत. या मुद्यावरून तेव्हाही त्यांच्यासंबंधाने तक्रारी होत्या. ‘पक्का शिवसैनिक है’ असे कार्यकर्ते पाठीमागे बोलत असत. शहरातील तीनपैकी पूर्व व पश्चिम मतदारसंघात काँग्रेसला सक्षम उमेदवार देऊन लढत देता आली असती. अनेक जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी तिकीट मागितले होते. मागितले नाही, असेही नाही; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर केलाच; पण नंतर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीवरून जो घोळ झाला, तशी वेळ यापूर्वी कधीही आली नव्हती. याला जबाबदार कोण? यात शहराध्यक्षांची भूमिका काहीच नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वमधून कुणाला पाठिंबा द्यावा यावरूनही शहराध्यक्षांच्या भूमिकेवरून चर्चा होत होती.
शहर काँग्रेसची ही तºहा, तर जिल्हा काँग्रेसचा परफॉर्मन्स तर न पाहवणारा. जिल्ह्यात अनेक जागा आघाडीत राष्ट्रवादी लढत आहे. अब्दुल सत्तार हे लोकसभेच्या वेळीच काँग्रेस सोडून गेले. संतोष कोल्हे हे काँग्रेसचे; पण ते आता कन्नडहून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढत आहेत. डॉ. कल्याण काळे हे मात्र स्वत:च्या ताकदीवर फुलंब्रीत चांगली लढत देत आहेत.
गळती सुरूचनिवडणुकीचा काळ सुरू असूनही शहरातील कितीतरी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. त्यांना रोखण्याचे प्रयत्न झाल्यासारखे दिसत नाहीत. शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले मीर हिदायत अली यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. रमजानी व नगरसेविका राहिलेल्या त्यांच्या पत्नीनेही एमआयएममध्ये प्रवेश केला. फार पूर्वीच अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे हे भाजपमध्ये दाखल झाले. अलीकडेच मनोज पाटील व राजकुमार जाधव हेही भाजपवासी झाले. ही गळती थांबविण्यासाठी काय प्रयत्न केले गेले, हे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले, याची जबाबदारी कुणावर? अशाने पक्ष कसा चालणार? जे कार्यकर्ते म्हणून कार्य करीत आहेत. तेही शहराध्यक्षांच्या वागण्या-बोलण्यावरून टीकेचे सूर उमटवत असतात.