औरंगाबाद : पूर्व मतदारसंघात सरासरी ६१.७५ टक्के मतदान झाले. या टक्केवारीनुसार १ लाख ९६ हजार ३३९ मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदारांमध्ये निरुत्साह असल्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का घसरला.
मतदारसंघात ३१२ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सर्वाधिक ३४ उमेदवार पूर्व मतदारसंघात होते. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप, एमआयएम, काँग्रेस पुरस्कृत, समाजवादी पार्टी अशी लढत मतदारसंघात झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी अतिशय कमी होती. दुपारनंतर मतदान वाढले. सायंकाळच्या टप्प्यात मतदानाचा जोर वाढल्यामुळे सरासरी ६१.७५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. मतदारसंघातील ३४ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते.
मतदानकेंद्रांचा फेरफटका मारला असता नारेगाव, ब्रिजवाडी, सिंदीबन व रोशनगेट, किराडपुरा, बायजीपुरा येथील मतदान केंद्रांवर गर्दी होती. काही केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेच्या आसपास ७० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले होते. काही ठिकाणचे मतदान केंद्र बदलण्यात आले होते. त्याची माहिती मतदारांपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिली गेली नाही. पुंडलिकनगर परिसरासाठी असलेले कडा आॅफिस येथील मतदान केंद्र बीएसजीएम शाळेत स्थलांतरित झाल्याची माहिती मतदारांना मिळालीच नाही. त्यामुळे अनेकांनी हेलपाटे मारल्यानंतर केंद्र बदलल्याची माहिती समोर आली. यामुळेदेखील मतदानाच्या टक्क्यांवर परिणाम झाला.
पैसे वाटपाची अफवापैसे वाटत असल्याच्या अफवेवरून काही ठिकाणी प्रचंड गदारोळ झाला. आंबेडकरनगर, सिंदीबन येथील मतदान केंद्रांच्या बाहेर प्रचंड गर्दी होती. परंतु पैसे वाटप होत असल्याची ती अफवा ठरली. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी दुपारनंतर प्रयत्न केले. परंतु मतदानाचा अपेक्षित टक्का वाढला नाही.
मतदानावरून आकडेमोड सुरू पूर्व मतदारसंघातील हिंदूबहुल भागातील अनेक केंद्रांवर ६० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले आहे. त्या तुलनेत मुस्लिम व दलित भागातील केंद्रांवरदेखील मतदान झाले आहे. त्याची माहिती घेऊन प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांनी आकडेमोड करण्यास सुरुवात केली आहे.
औरंगाबाद पूर्वमध्ये असा वाढला मतदानाचा टक्कासकाळी ७ ते ९ वाजता : ८.०५ टक्केसकाळी ९ ते ११ वाजता : १३.०९ टक्केदुपारी ११ ते १ वाजता : २८.०२टक्के दुपारी १ ते ३ वाजता : ४४.०८ टक्के सायंकाळी ३ ते ५ वाजता : ५४.५५ टक्के सायंकाळी ५ ते ६ वाजता : ६१.७३ टक्के