औरंगाबाद : ‘निवडणूक ही एक संधी आहे. मंदिर, मशीद, हिंदू- मुस्लिम असा वादाचा हा मुद्दा नाही. दिवसेंदिवस नकारात्मकतेची आग वाढत चालली आहे. ती आग या निवडणुकीच्या माध्यमातून बुजवा’ असे आवाहन आज येथे पुरोगामी विचारांचे युवा नेते कॉ. कन्हैयाकुमार यांनी केले. ते आमखास मैदानावर भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अॅड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
भाकपची ताकद किती असा सवाल विचारणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ताकद लोकसंख्येवरून मोजली जात नाही. वैचारिक पातळीवर ती अवलंबून असते. भाकपची ताकद काल होती, आज आहे आणि उद्याही राहील (टाळ्या) ३५ जिव्हाळ्याचे मुद्दे घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे. निवडून येईल न येईल; पण या मुद्यांसाठी माझी रस्त्यावरची लढाई चालूच राहील, अशी ग्वाही यावेळी उमेदवार टाकसाळ यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली.
या सभेत एस. जी. शुत्तारी, कॉ. भगवान भोजने, अॅड. जनार्दन भोवते, साथी सुभाष लोमटे, कॉ. अश्फाक सलामी, आसाराम लहाने पाटील, कॉ. बुद्धप्रिय कबीर आदींची भाषणे झाली. कॉ. भास्कर लहाने यांनी सूत्रसंचालन केले, तर शेवटी कॉ. राम बाहेती यांनी आभार मानले. मंचावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. मनोहर टाकसाळ, अण्णा खंदारे, कॉ. पंडित मुंढे यांच्यासह नेते इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेपूर्वी कन्हैयाकुमार रॅलीने सभास्थानी आले.
भगतसिंगांचा अपमानस्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न म्हणजे भगतसिंग यांचा अपमान होय. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि देशासाठी भगतसिंग फासावर गेले होते. दोघे एकाच तराजूत तोलले जाऊ शकत नाहीत, असा टोला कन्हैयाकुमार यांनी लगावला.नेमके निवडणुकीतच कसे अस्मितेचे, भावनेचे प्रश्न निर्माण केले जातात, याचे हे उदाहरण होय, असेही ते म्हणाले. रॅलीत सावरकर चौक लागले. तिथे खड्डेच खड्डे. हे साधे खड्डे न बुजवू शकत नाहीत. अन् सावरकरांना भारतरत्न देऊ म्हणताच हंशा नि टाळ्या झाल्या.
मग निवडणूक घ्यायची काय गरज? महाराष्टÑात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत, असा प्रचार सुरू आहे, असे असेल, तर मग निवडणूकच घ्यायची काय गरज? निवडणूक न घेतल्याने तेवढा खर्च तरी वाचेल ना? लोकशाहीत पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार लोक ठरवत असतात; पण प्रचारतंत्र असे वापरले जात आहे की, खोटेही खरे वाटावे. निवडणुकीत तुम्ही जीवनमरणाचे प्रश्नच विसरावेत, असा प्रयत्न होत आहे, असे परखड मत कन्हैयाकुमार यांनी यावेळी मांडले.