- राम शिनगारे
औरंगाबाद : सिल्लोड शहरात आगामी २५ वर्षांत वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला आहे. यासाठी १०० कोटी रुपये खर्च आला असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली असल्याचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. याशिवाय सिल्लोड शहरातील राम-रहीम बाजारपेठ पूर्ण करण्यात येणार असून, त्यात ५०० दुकाने बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे अपूर्ण काम आगामी काळात पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिल्लोड मतदारसंघातून ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. मागील दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात लाल्या रोग, बोंड अळी, दुष्काळी मदत मिळविण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले. माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवातच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून झालेली आहे. नंतर सिल्लोडचे नगराध्यक्षपद भूषविले. सिल्लोड शहराच्या पाणीपुरवठ्याची योजना मागील आघाडी सरकारच्या काळात शेवटच्या तीन महिन्यांत मंजूर केली होती. मात्र, विद्यमान युती सरकार सत्तेवर येताच त्यांनी आघाडीच्या काळात शेवटच्या तीन महिन्यांत घेतलेले सर्व निर्णय रद्द केले. याचा फटका सिल्लोडच्या पाणीपुरवठा योजनेला बसण्याची शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मदत केली. मुख्यमंत्र्यांनी योजना रद्द तर केलीच नाही. उलट निधी उपलब्ध करून दिला. यामुळे सिल्लोड शहराला ६२ किलोमीटर अंतरावरून पाणी आणता आले. योजनेसाठी आगामी २५ वर्षांतील लोकसंख्येचा विचार करण्यात आलेला आहे. याशिवाय मतदारसंघात वीज आणि रस्त्यांच्या समस्या सोडविण्यालाही प्राधान्य दिले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून परिसरातील वनजमिनीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात होणार नुकसान थांबविण्यासाठी विशेष योजना आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय टिटवी, सोडतबाजार, पेडगाव आदी प्रकल्पांच्या माध्यमातून हक्काचे पाणी अडविण्याचे कामही या मतदारसंघात केले असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मांडणा गावचा रस्ता केला नाहीसिल्लोड मतदारसंघातील एकमेव मांडणा गावचा रस्ता आपण केला नाही. त्याला कारणही तसेच आहे. भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांचे हे गाव आहे. त्यांनी गावाची जबाबदारी घेतली होती. त्यांचे मोठे नेटवर्क होते. तरीही ते रस्ता करू शकले नाहीत. मात्र, आता त्या रस्त्याचेही काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना प्रथम स्थानी आणलीसिल्लोड मतदारसंघात शिवसेना कोठेच सत्तेमध्ये नव्हती. आता नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आदी संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यात येत आहे. जे लोक माझा २५ वर्षांपासून तिरस्कार करीत होते. ते आज जयजयकार करीत आहेत. यापेक्षा अधिक काय पाहिजे? शिवसेनेच्या जुन्या लोकांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. माझे स्वत:चे १ लाख मतदान आहे. त्यात शिवसेना आणि भाजपच्या ५० हजार मतांची अधिक भर पडली असल्याचेही ते म्हणाले.
थेट मातोश्रीवर हॉटलाईन : शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी मानसन्मान मिळत असल्यामुळे मुस्लिम मतदारही आनंदात आहेत. शिवसेनेत प्रवेश करतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर भगवा हाती घेतल्यानंतर सन्मान मिळत आहे. थेट मातोश्रीसोबत हॉटलाईन आहे. अधेमधे कोणीही नाही. मातोश्रीवर थेट प्रवेश मिळविणारा मी एकटाच असल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच आगामी काळात राज्यातील शिवसेनाचा मुस्लिम चेहरा म्हणून आपणास सर्वमान्यता मिळालेली असेल, असेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
राम-रहीम मार्केट पूर्ण करणारसिल्लोड नगरपालिकेच्या वतीने राम-रहीम मार्केटच्या उभारणीचे काम सुरू केले होते. मागील आघाडी सरकारने त्यास मंजुरी दिली होती. मात्र, त्यास स्थगिती मिळाली. यानंतर विविध माध्यमातून त्यास तीन वेळा स्थगिती देण्यात आली. यानंतर तीन सचिवांची चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशीतही काही आढळून आले नाही. मुख्यमंत्र्यांनाही या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे हा अपूर्ण राहिलेला प्रकल्प आगामी काळात पूर्ण केला जाईल. हा प्रकल्प नगरपालिकेच्या मालकीचा आहे. ५०० गाळ्यांचे बांधकाम केले जाणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिल्लोडला लवकरच राष्ट्रीय महामार्गअजिंठा ते लेणी हा चौपदरी रस्ता करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी हा एवढाच रस्ता न करता थेट औरंगाबाद ते जळगाव असाच राष्ट्रीय महामार्ग करण्यास मंजुरी दिली. त्याचे कामही सुरू केले होते. मात्र, कंत्राटदार काम अर्धवट टाकून निघून गेला. त्यामुळे हा रस्ता रखडला. आता दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. नुकतेच रस्त्याचे कामही सुरू केले. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच साकारण्यात येईल. त्यातून सिल्लोड हे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील ३७ रस्त्यांच्या कामांसाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मागील सहा महिन्यांपासून लोकसभा, विधान परिषद आणि आता विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या कामांना सुरुवात झालेली नाही. निविदा काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात एकही रस्ता अपूर्ण राहणार नाही, असेही सत्तार यांनी सांगितले.
सख्ख्या मामाला पंचायतीत निवडून आणू शकले नाहीतमाझ्या विरोधात भाजपमधील १२ जण होते. त्यात विद्यमान अपक्ष उमेदवारांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. ते १३ वे इच्छुक होते. त्यांना स्वत:च्या सख्ख्या मामाला पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आणता आले नाही. त्यांचे माझ्यासमोर कितपत आव्हान असेल, असा सवालही सत्तार यांनी उपस्थित केला. आतापर्यंत पालोद जि.प. सर्कलमध्ये कमी मते पडत होती. मात्र, आता तिथेही मोठ्या संख्येने मते मिळतील. आता यावेळी दाखवून देईल की, पालोदमधून कोणाला लीड मिळते ते, असे खुले आव्हानही त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांना दिले.