कन्नड : शहराचे माजी नगराध्यक्ष यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळविल्याने विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. उमेदवारी मिळाल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. पिशोर नाक्यावर त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
संतोष कोल्हे काँग्रेस पक्षाकडून नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या गटनेते आहेत. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष आहेत. २००६ पासून नगर परिषदेवर त्यांची सत्ता आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी जाहीर केला होता. त्या दृष्टीने त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधला. शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही.
तथापि, संतोष कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली. त्यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या तरी शिव स्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव, शिवसेनेचे उदयसिंग राजपूत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे हे उमेदवार तुल्यबळ असल्याने निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे.