औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सिल्लोड येथील प्रचार सभेवरून राजकीय कोंडी झाल्याचे दिसते आहे. सभा घेतली तर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, नाही घेतली तर महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचा त्रास भोकरदनमध्ये सहन करावा लागेल, अशी स्थिती आहे. युती धर्म पाळायचा, पक्ष कार्यकर्त्यांकडे पाहायचे की, भोकरदनमध्ये मुलासाठी राजकीय गणित जुळवायचे, कात्रीत दानवे सापडले आहेत.
युतीधर्मात दानवे यांना शिवसेना उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यासाठी सिल्लोड येथे प्रचार सभा घेणे गरजेचे आहे; परंतु भाजप कार्यकर्त्यांनी दानवे यांना सभा घेण्यास विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे दानवे यांनी सभा घेतली नाही तर त्याचे पडसाद भोकरदनमध्ये उमटतील, असा धमकीवजा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिल्याची चर्चा आहे. सभा घेतली तर भाजपचे कार्यकर्ते नाराज, नाही घेतली तर मुलाच्या जय-पराजयाचे गणित जुळविण्यासाठी होणारा त्रास, यातून दानवे कसा मार्ग काढतात हे पाहावे लागेल.
विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे देण्यात आला. शिवसेनेने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले. त्या नाराजीतूनच प्रभाकर पालोदकर यांची अपक्ष म्हणून उमेदवारी पुढे आली. आता भाजप पदाधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेत रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडमध्ये अ. सत्तार यांच्यासाठी प्रचार सभा घेतली, तर त्याचे पडसाद भोकरदनमध्ये उमटतील. भाजप पदाधिकाऱ्यांची सर्व नाती-गोती भोकरदनमध्ये आहेत. जसा सत्तारांनी इशारा दिला आहे, तसाच इशारा पदाधिकाऱ्यांनीदेखील दिल्याची चर्चा आहे, अशा दोन्ही बाजूंनी दानवे यांची कोंडी झाल्यामुळे यातून ते नेमका कोणता मार्ग काढतात, याकडे लक्ष लागले आहे. याप्रकरणी दानवे यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र, त्यांच्याशी संपर्क झाला नाही.