वैजापुर : दिलेला शब्द न पाळणारे, सामान्यांची फसवणूक करणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही, असे रोखठोक उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजप सरकारला टोला लगाविला. वैजापुर विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार अभय पाटिल चिकटगावकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
विधानसभेचा प्रचार रंगात आला असून, वैजापुर मतदारसंघासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी आपल्या शैलित मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस यांच्यावरच शरसंधान साधले. यावेळी शरद पवारांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले की, महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद, ५२ वर्ष सलग माझ्यावर प्रेम केलं. मला आता सत्ता तरुणाच्या हाती द्यायची आहे. गेल्या दोन महिन्यात नाशिकमधील कारखान्यात १५ हजार कामगार कामावरून कमी केले. औरंगाबाद जिल्ह्यात देखील हीच अवस्था आहे. म्हणून बदल हवा आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांवर प्रेम असल्याचा देखावा करत कर्जमाफी केल्याचा नुसता देखावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. अजूनही राज्यातील ६१ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत न मिळाल्याने त्यांची परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये तर एका कुटुंबाच्या घरी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्रिमंडळ भेट देऊन आले होते. त्यामुळे अशा अकार्यक्षम, संवेदनाहीन सरकारला खुर्चीवरून खाली खेचायला हवे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ.सतीश चव्हाण,आ.भाऊसाहेब पा.चिकटगावकर,प्रमोद जगताप,प्रताप निंबाळकर,अभिजीत देशमुख,प्रशांत सदाफळ,यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.