औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्यामुळे शिवसेना संतापली आहे; परंतु संतापापलीकडे शिवसेनेला सध्या काहीही करता येत नाही. जाधव यांना जशास तसे उत्तर दिल्यास त्याचा फायदा सेनेऐवजी जाधव यांनाच होईल. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्याचे पडसाद वेगळ्या प्रकारे उमटतील, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’अशा प्रकारची कोंडी शिवसेनेची जाधव यांच्या प्रकरणात होऊन बसली आहे.
जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेला आव्हान दिले. लोकसभेच्या निकालाची कारणमीमांसा करताना काय घडले हे सर्वपरिचित आहे. लोकसभेत शिवसेनेच्या पराभवाचे शल्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातून जाण्यास तयार नाही. त्यांनी कन्नड आणि औरंगाबादमध्ये १० आॅक्टोबरच्या सभेत जाधव यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. येथील भगवा खाली उतरण्यास जाधव जबाबदार असल्याचा हल्ला ठाकरे यांनी चढविला. त्या टीकेचे उत्तर देताना जाधव यांनी कन्नडमधील एका प्रचार सभेत ठाकरेंबाबत खालचे शब्द वापरले. यातूनच शिवसेनाविरुद्ध जाधव असे चित्र उभे राहिले आहे. बुधवारी रात्री जाधव यांच्या घरावर हल्लादेखील याच प्रकरणातून झाला.
शिवसेनेच्या औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील दिल्या. हे सगळे झाले तरी शिवसेना जाधव यांना थेट उत्तर देऊ शकत नाही. तसे उत्तर दिल्यास जाधव यांना सामाजिक लाभ होईल, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळे इतर मतदारसंघातदेखील वेगळाच संदेश जाईल. परिणामी सबुरीच्या भूमिकेतून शिवसेना या प्रकरणाकडे सध्या तरी पाहत आहे.
Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
पाच वर्षे जमलेच नाहीमागील ५ वर्षे जाधव यांनी कन्नड मतदारसंघात शिवसेनेकडून काम केले; परंतु ते काम करीत असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात फारसे सख्ख्य राहिले नाही. मतदारसंघात खैरे लुडबुड करीत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला. त्यातूनच बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात जाऊन काम केले. स्वत:चे पॅनल उभे करून त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले. कालांतराने त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा पक्ष स्थापन केला.