औरंगाबाद : परळी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या चुलत बहीण-भावात होत असलेली अटीतटीची लढत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतआहे. दोघांसाठीही राजकीयदृष्ट्या ही अस्तित्वाची लढाई आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंकजा यांच्यासाठी, तर शरद पवार यांनी धनंजय यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्याने येथे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांचे कडवे आव्हान आहे. सिल्लोड मतदारसंघात यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर सलग दोन वेळा विजय मिळविलेल्या अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन तिकीट मिळविले. भाजपचे सर्वच पदाधिकारी आणि सत्तारविरोधक येथे एकवटले असून हे सर्वजण अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्यामागे उभे आहेत.
विधानसभा अध्यक्ष तथा भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे पुन्हा रिंगणात आहेत. परभणी जिल्ह्यात जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आ़. विजय भांबळे आणि भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्यात काट्याची लढत होत आहे़.
परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आ़ डॉ़ राहुल पाटील, काँग्रेसचे रविराज देशमुख, अपक्ष सुरेश नागरे, वंचितचे मोहंमद गौस आणि एमआयएमचे अली खान यांच्यात लढत होत आहे़. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभेत शिवसेनेचे संतोष बांगर व काँग्रेसचे आमदार संतोष टारफे यांच्यात लढत आहे. वसमत विधानसभेत शिवसेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा, अपक्ष शिवाजीराव जाधव व राष्ट्रवादीचे राजू नवघरे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
लातूर शहर मतदारसंघातून आ. अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख हे दोघे बंधू काँग्रेसकडून रिंगणात आहेत़ या मतदारासंघाचे नेतृत्व प्रदीर्घ काळ दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी केले होते़ तर निलंगा विधानसभा मतदारसंघात कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर निवडणूक मैदानात असून, त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर आहेत़ पुन्हा एकदा निलंगा मतदारसंघात काका-पुतण्यामध्ये सामना होणार आहे़ तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्याविरूद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक हे निवडणूक रिंगणात आहेत़
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ आहेत़ माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील हे भाजपाकडून तुळजापूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विरूद्ध निवडणूक लढवित आहेत़ तर परंडा मतदारसंघात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत विरूद्ध राष्ट्रवादीचे आ़ राहूल मोटे अशी लढत होणार आहे़
नांदेड : नऊ विधानसभा मतदारसंघात भाजप-सेनाविरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असाच सामना रंगला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही सर्व नऊ मतदारसंघांत उमेदवार दिले असून, वंचितची मते निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. भोकरमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपचे बापूसाहेब गोरठेकर यांच्याशी थेट सामना होत आहे.जालना : विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकांपासून हे दोघे एकमेकांसमोर आहेत.