औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत; परंतु एमआयएमला प्रचारात अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. पक्षाच्या २४ नगरसेवकांनी मागील पाच वर्षांमध्ये विकासकामांकडे पाठ फिरवली. त्यामुळे उमेदवारांना ठिकठिकाणी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अनेक नगरसेवकांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे. पक्षातील अंतर्गत कलहाचा फायदा विरोधकांच्या पथ्यावर पडतो आहे.
२०१४ मध्ये औरंगाबाद शहरातील मुस्लिम मतदारांनी एमआयएमला भरभरून मतदान केले. त्यामुळे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात पक्षाला यश मिळाले. त्यापाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे तब्बल २५ नगरसेवक निवडून आले. मतदारांनी टाकलेला विश्वास एमआयएमला टिकवता आला नाही. अनेक वॉर्डांमध्ये विकासकामेच झाली नाहीत. त्यामुळे संतप्त नागरिक ठिकठिकाणी एमआयएमच्या उमेदवाराला विरोध दर्शवीत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये, तर उमेदवारास प्रचारासाठी पायही ठेवू दिला नाही. पक्ष संकटात असताना नगरसेवक पुढे येऊन परिस्थितीचा मुकाबला करायला तयार नाहीत. उमेदवार वॉर्डात आल्यावर त्याच्यासोबत औपचारिकता म्हणून नगरसेवक फिरत आहेत. उमेदवारांची पाठ फिरली की, नगरसेवकही प्रचाराकडे पाठ फिरवीत आहेत. पक्षात नगरसेवकांचेही दोन गट पडले आहेत.
एका गटाचे नगरसेवक दुसऱ्या नेत्याचे नेतृत्व मान्य करीत नाहीत. पक्षातील अंतर्गत कलह बराच वाढला आहे. मतदानासाठी फक्त ६ दिवस शिल्लक असतानाही तिन्ही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी १७ आॅक्टोबरपासून शहरात तळ ठोकून बसणार आहेत. पदयात्रा, जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ते आल्यानंतरच परिस्थिती सुधारेल, अशी उमेदवारांना आशा आहे. तोपर्यंत विरोधक प्रचारात बाजी मारणार आहेत.
जातीयवादी शक्तींसोबत हात मिळवणीचे परिणामएमआयएम पक्षाच्या नेत्यांनी आजपर्यंत जातीयवादी शक्तींचा कडाडून विरोधाचा आभासच निर्माण केला. मागील पाच वर्षांमध्ये महापालिकेत एमआयएमने जातीयवादी शक्तींसोबत थेट हातमिळविणीच केली. त्याचेही परिणाम या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला त्रासदायक ठरत आहेत. स्थायी समितीचा सभापती निवडताना एमआयएमने शिवसेनेसमोर उमेदवारच उभा केला नव्हता. मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर सेना-भाजपने अविश्वास ठराव आणल्यावर एमआयएमने युतीला साथ दिली होती. अलीकडेच झालेल्या औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना एमआयएम नगरसेवकांनी मतदान केले होते.
जावेद कुरैशी फॅक्टरऔरंगाबाद मध्य विधानसभा मतदरसंघातून एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांना तिकीट मिळेल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, कुरैैशी यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी अगोदर बंडखोरी केली. नंतर धर्मगुरूंच्या आदेशावरून माघारही घेतली. जावेद कुरैशी पुन्हा एमआयएम पक्षात सक्रिय होतील, असे वाटले होते. मात्र, त्यांनी पक्षापासून दूर राहणे पसंत केले आहे. गुरुवारी सायंकाळी पक्षप्रमुख शहरात येत आहेत. ते कुरैशी यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.