औरंगाबाद: कटकटगेट येथे झालेल्या राड्याप्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना, नगरसेवक अज्जू पैलवान यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयएमने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.
कटकटगेट येथे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना हे परस्परांवर धावून गेल्यांनतर कार्यकर्त्यांत झटापट झाली होती. यावेळी पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगविला होता. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास एमआयएमचे कार्यकर्ते घोषणा देत रोशन गेट येथून कदीर मौलानाच्या घराकडे निघाले होते. ही बाब पोलिसांना कळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा कदीर मौलाना यांच्या घराबाहेर उभा होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढत, कदीर मौलाना यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. यानंतर जमाव शांत झाला आणि तेथून परतला. काही वेळानंतर पोलिसांनी नगरसेवक अज्जू पैलवान यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कदीर मौलाना यांचे चिरंजीव ओसामा कदीर यांचा पोलीस शोध घेत असल्याचे सुत्रांनी सांगितले.