औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावल्या. तीन आठवड्यांपासून सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप थांबले. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धावपळ सुरू आहे. जास्तीत जास्त मतदान आपल्या पदरात कसे पाडून घेता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी प्रत्यक्ष मतदान होईल.मतदारांना शासकीय पोलचिट मिळाले किंवा नाही, यासाठी उमेदवारांनी कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यातील सिल्लोड, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद शहरात शिवसेना-भाजप युतीने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांत एमआयएम पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. यातील औरंगाबाद मध्य मतदारसंघ एमआयएमसाठी महत्त्वपूर्ण आहे. मागील निवडणुकीत एमआयएमने हा मतदारसंघ सेनेकडून हिसकावून घेतला होता. यंदा मतदारसंघ परत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात निवडणूक रंजक ठरत आहे.शिवसेना उमेदवाराचे हॅट्ट्रिकसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराने या मतदारसंघात चांगलेच आव्हान उभे केले आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या. याची सर्वात अगोदर सुरुवात एमआयएम पक्षाने केली. आमखास मैदानावर असदुद्दीन ओवेसी यांची २ आॅक्टोबरला सभा झाली. त्यानंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही सभा झाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचीही सभा आमखास मैदानावर घेण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आगामी दोन दिवस शहरात तळ ठोकणार आहेत.
शेवटच्या दिवशी दुचाकी रॅलीची धूम विधानसभा निवडणुकीची प्रचाराची सांगता प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी दुचाकी रॅलीने केली. मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ क्रांतीचौक येथून, पूर्व मतदारसंघाचे भाजप उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ एन-७ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून, पश्चिम मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ कोकणवाडी येथून, फुलंब्री मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारार्थ चिकलठाणा आठवडी बाजार येथून रॅली काढण्यात आली. तर मध्य आणि पूर्व मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवारांसाठी एमआयएमचे सर्वेसर्वा खा.ओवेसी यांची कटकटगेट येथे पदयात्रा काढली.