औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आरपीआय (ड्रेमोक्रॅटिक)चे राज्याध्यक्ष तथा जि.प. सदस्य रमेश गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांच्या शपथपत्रात गुन्हा नोंदच्या कॉलममध्ये दुरुस्ती राहिली होती. ही चूक निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिल्यानंतरही ती दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे अर्ज बाद झाला. चूक लक्षात आणून दिल्यानंतरही दुरुस्त न केल्यामुळे गायकवाड यांनी काँग्रेसशी दगाबाजी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पाराणी भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रमेश गायकवाड यांची किरकोळ चूक असताना त्यांच्या लक्षात आणून दिली का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी निवडणूक आयोगाकडून त्यांना दोन लेखी पत्र देण्यात आले आहेत. पत्रांच्या माध्यमातून उमेदवारी अर्जात चूक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर त्यांना चूक दुरुस्त करण्यास संधीही देण्यात आली. मात्र ती चूक दुरुस्त करण्यात आली नसल्यामुळे नियमानुसार अर्ज बाद करण्यात आल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.
यामुळे रमेश गायकवाड यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतल्यानंतरही जाणीवपूर्वक चूक ठेवली का? चूक लक्षात आणून दिल्यानंतरही दुरुस्त का केली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. गायकवाड यांनी याअगोदर अनेक निवडणुका लढविल्या आहेत. ते एका जबाबदार पक्षाचे पदाधिकारी असताना अशी चूक कशी होऊ शकते, असा सवालही उपस्थित होत आहे. यामुळे गायकवाड यांनी काँग्रेसशी दगाबाजी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही गायकवाड यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली. या प्रकरणावर रमेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
काँग्रेससोबत दगाबाजीच केली- नामदेव पवारनिवडणूक आयोगाने रमेश गायकवाड यांच्या अर्जातील चूक दुरुस्त करण्यासाठी पत्र दिले. तरीही त्यांनी ती चूक दुरुस्त केली नाही. त्यांना निवडणूक लढवायची नव्हती. तरीही त्यांनी तिकीट घेतले. ही काँग्रेससोबत दगाबाजी असल्याचे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली. चूक दुरुस्त करण्याचे सांगूनही कायम ठेवली असेल तर हे काँग्रेसचे दुर्दैव आहे, अशी भावना जितेंद्र देहाडे यांनी व्यक्त केली.