Maharashtra Election 2019 : बंडखोरांचा ‘फ्राय’डे!; कुरघोडीच्या राजकारणात फावेल की माघार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:50 AM2019-10-05T11:50:11+5:302019-10-05T12:05:04+5:30
शहरातील तीन मतदासंघासोबत जिल्ह्यात ही झाली बंडखोरी
औरंगाबाद : शहरातील मध्य, पश्चिम आणि पूर्व मतदारसंघांत शिवसेना आणि भाजप युतीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध दोन्ही पक्षांतील उमेदवारांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. शुक्रवार बंडखोरीच्या राजकारणामुळे पक्षाच्या उमेदवारांसाठी ‘फ्राय’डे ठरला. ७ तारखेपर्यंत ऊठबशीच्या राजकारणात ज्यांचे फावेल किंवा माघारीसाठी दबाव आला, तर बंडोबा थंड होणे शक्य आहे.
शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्याविरुद्ध भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी दाखल केली आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध भाजपचे राजू शिंदे यांनी दंड थोपटले आहेत. याचवेळी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपचे अतुल सावे यांच्याविरोधात शिवसेनेच्या राजू वैद्य यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तसेच मध्य मतदारसंघात एमआयएमच्या नासेर सिद्दीकी यांच्याविरुद्ध उमेदवारीची अपेक्षा असलेले जावेद कुरेशी हे मैदानात उतरले आहेत.
शिवसेनेच्या जैस्वाल आणि शिरसाट या उमेदवारांविरुद्ध भाजपचे उमेदवार अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे चित्र दिसताच शिवसेनेनेही सावे यांच्याविरुद्ध वैद्य यांना अर्ज दाखल करण्यास सांगून जशास तसे उत्तर दिले आहे. यामुळे जिल्ह्यात युतीमध्ये आलबेल नसल्याचे समोर येत आहे. शनिवारी ५ रोजी अर्ज छाननी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ही ७ आॅक्टोबर आहे. शिवसेना, भाजप आणि एमआयएमच्या बंडखोरांनी अर्ज दाखल केले असले तरी त्यांची उमेदवारी कायम राहते की नाही, हे ७ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
औरंगाबाद मध्यमधील बंड
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शिवसेना आणि भाजप युतीमधील कुरघोडीचे राजकारण समोर आले. विधानसभा निवडणुकीत युती होणार नाही, असे गृहीत धरून युतीमधील दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी मोठी तयारी केली होती. मध्य मतदारसंघातून जैस्वाल हे दावेदार होते आणि त्यांनाच युतीमध्ये शिवसेनेचे तिकीट मिळाले. भाजपमधून २०१४ ला पराभूत झालेले किशनचंद तनवाणी हेदेखील तयारीत होते. जैस्वाल यांना तिकीट जाहीर होताच तनवाणी यांच्या गोटात नाराजीचे चित्र पसरले होते. त्यामुळे तनवाणी यांनी बंडखोरी करीत शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला आहे.
औरंगाबाद पश्चिममधील स्थिती
पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे शिरसाट हे युतीचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे समर्थक भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनीही मागील तीन ते चार वर्षांपासून तयारी चालविली होती. त्यांनीही शिरसाट यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारत अर्ज दाखल केला, तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संतोष नांदूरकर यांनीही अर्ज दाखल केले.
पूर्व मतदारसंघातील चित्र असे
पूर्व मतदारसंघामध्ये भाजपचे अतुल सावे हे महायुतीचे उमेदवार आहेत. शिंदे आणि तनवाणी यांनी अर्ज दाखल केल्यामुळे सावे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी अर्ज दाखल केला आहे. युती झाली नसती, तर वैद्य यांचीही शिवसेनेकडून लढण्याची आधीपासूनच तयारी होती.
एमआयएममध्येही बंडाचे निशाण
औरंगाबाद मध्य मतदारसंघातच एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांच्याविरुद्ध उमेदवारीची आस असलेले जावेद कुरेशी यांनी अर्ज दाखल करून खळबळ उडविली आहे. आधी एमआयएमचे कट्टर कार्यकर्ते असलेले कुरेशी यांना पक्ष़ातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात ते पुन्हा पक्षात आले होते. त्यांना विधानसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन त्यावेळी मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात पूर्वमधून बंडखोरीची सुरुवात
शिवसेनेच्या दोन उमेदवारांविरुद्ध भाजपचे बंडखोर मैदानात उतरले आहेत, तर भाजपविरुद्ध शिवसेनेचा एक बंडखोर आहे. तिन्ही बंडखोर कायम राहिले तर युतीच्या तिन्ही उमेदवारांना धोका आहे. युतीमध्ये शहराच्या तीन मतदारसंघांमध्ये भाजपच्या वाट्याला औरंगाबाद पूर्व हा एकच मतदारसंघ आहे, तर दोन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेले आहेत. औरंगाबाद पूर्वमध्ये शिवसेनेचा बंडखोर उमेदवार राहिल्यास अतुल सावे यांना धोका आहे. पूर्व मतदारसंघात वैद्य यांनी अर्ज भरल्यामुळे इतर मतदारसंघांत सेनेच्या विरोधात भाजपने उमेदवारी अर्ज भरले. भाजपचे बंडखोर मैदानात राहिल्यास शिवसेनेच्या उमेदवारांना धोका आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवारांविरुद्ध आता अर्ज दाखल केलेल्यांचे बंड थंड होणार की त्यांचा झेंडा कायम राहणार, हे सोमवारी दुपारी ३ वा. स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातही झाली बंडखोरी
जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघात शिवसेना उमेदवार रमेश बोरनारे यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, दिनेश परदेशी यांनी उमेदवारी दाखल केली. कन्नड मतदारसंघातून शिवसेना उमेदवार उदय राजपूत यांच्या विरोधात भाजपचे संजय गव्हाणे यांनी अर्ज भरला आहे, तसेच गुरुवारी ग्रामीण मतदारसंघातून बंडखोरी झाल्यामुळे शहरी मतदारसंघांत शिवसेनेने भाजपविरोधात बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे.
बंडखोर म्हणतात...
शिवसेनेने बंडखोरी केली म्हणून...
बंडखोरीचे सत्र राज्यभर सुरू आहे. शिवसेनेने बंडखोरी केली म्हणून, आपणही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात समर्थकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.
-किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप
निवडणुकीचे मैदान कदापि सोडणार नाही
निवडणूक लढवावी हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. मतदारसंघातील हजारो नागरिकांची ही भावना आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणताही दबाव आल्यास उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. निवडणूक लढविणार म्हणजे लढविणारच. माझ्यावर अन्याय झाला. अन्यायाच्या विरोधात लढणे म्हणजे बंड नाही. ‘५६ आले ५६ गेले’ म्हणणाºयांना आम्हीसुद्धा दाखवून देऊ. ३० वर्षांपासून मतदारसंघात काम करतोय तेथील मतदार कोणाच्या पाठीशी राहणार, हे लवकरच दिसून येईल.
-जावेद कुरैशी, माजी जिल्हाध्यक्ष, एमआयएम
बंडखोरी पक्षाच्या नव्हे, उमेदवाराच्या विरोधात
पश्चिम मतदारसंघात अजिबात विकास झालेला नाही. विद्यमान आमदाराच्या विरोधात असंतोष आहे. मी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेली नाही. उमेदवाराच्या विरोधात बंड केले आहे. या भागातील नागरिक सुशिक्षित आणि सुज्ञ आहेत. त्यांच्या भावना पक्षाने समजून घेतल्या पाहिजेत. मतदारांना केंद्रबिंदू मानून मी अर्ज दाखल केला. नागरिकांच्याच आग्रहास्तव मी निवडणूक रिंगणात उतरलो.
-राजू शिंदे, नगरसेवक भाजप
पक्षाचा आदेश अंतिम...
पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले, म्हणून पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल, तो मान्य असेल.
-राजू वैद्य, नगरसेवक, शिवसेना
वैजापुरात बंडखोरी
वैजापूरमधील शिवसेना उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. पक्ष जो आदेश देईल, तो मान्य असेल. मागील काही वर्षांपासून मी जनतेसाठी अहोरात्र काम करीत आहे. उमेदवारी दाखल करावी ही कार्यकर्त्यांची इच्छा होती.
-एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप
पक्षाच्या आदेशानुसारच अर्ज भरला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षाने मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. तुम्हाला उमेदवारी दिली असून, नामांकन दाखल करा. ४ आॅक्टोबरला तुम्हाला बी फॉर्म पोहोच करण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. यामुळेच आपण उमेदवारी अर्ज भरला आहे. आता ६ आॅक्टोबरला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
-डॉ. ज्ञानेश्वर नीळ