औरंगाबाद : औरंगाबाद कनेक्ट टीम आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहराचा पर्यावरण जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. खाम नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय करणे, वृक्ष संवर्धन, स्वेच्छा निधीपैकी दरवर्षी किमान १० टक्के निधी पर्यावरणविषयक कामांसाठीच खर्च करणे बंधनकारक करावे, आदी मुद्यांचा त्यात समावेश आहे.
पर्यावरणप्रेमी नागरिक आणि अभ्यासकांच्या चर्चेतून हा पर्यावरण जाहीरनामा तयार झाला आहे. औरंगाबादच्या सर्व मतदारसंघांतील उमेदवारांना तो दिला जात आहे. सोबतच उमेदवारांनी याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करण्याची विनंती करण्यात येत आहे. निवडणुकीनंतर तिन्ही मतदारसंघांतील नवनिर्वाचित आमदारांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
जाहीरनाम्यात वीजपुरवठा केबल पूर्णत: भूमिगत करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडे प्रस्ताव आणि पाठपुरावा, वृक्षतोडीवर निर्बंध घालण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी पाठपुरावा आमदारांनी करावा, दरवर्षी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात किमान २०० वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, दक्षिण भागातील जैवविविधता धोक्यात येऊन आॅक्सिजन हब संपुष्टात येत आहेत. यासाठी विशेष लक्ष देणे, आदी बाबींचा समावेश आहे.
जाहीरनाम्यातील काही मुद्दे - खाम नदीचे प्रदूषण तात्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करणे. - खाम नदीतील अतिक्रमणे हटवणे. नदी काठावर वृक्ष लागवड करणे.- सुखना नदीत सोडले जाणारे सांडपाणी थांबवणे.- कचरा संकलन ते प्रक्रिया याची पूर्ण माहिती नागरिकांना जाहीर करणे.- नहर-ए-अंबरी व अन्य पुरातन नहरींच्या संवर्धनासाठी योजना आखणे. - पाणी वापर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला आग्रह धरणे.- जलसंवर्धनासाठी निधी मिळविण्यासह विहिरी, बारवांचे पुरुज्जीवन.- सर्व कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य करणे.- दरवर्षी पर्यावरण वस्तुस्थिती अहवाल जाहीर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रवृत्त करणे.