औरंगाबाद : नोटाबंदीनंतर देशभरात ६ लाख कंपन्या बंद पडल्या आणि महाराष्ट्रात ही संख्या जवळपास दोन लाख कंपन्यांपेक्षाही अधिक आहे. म्हणजे मोदींच्या काळात नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमावण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.
औरंगाबाद मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या प्रचारार्थ हर्सूल येथे आयोजित सभेत ते काल रात्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही मंदी आली होती; पण मनमोहनसिंगांचे नेतृत्व इतके चांगले होते की, त्यावेळी युवकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या नाहीत. आज नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मात्र नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमवाव्या लागण्याचा जोरदार कार्यक्रम सुरू आहे.
औरंगाबादच्या स्कोडा कंपनीत जाऊन पाहा. जिथे शंभर गाड्या बनवल्या जात होत्या, तिथे आता २०-३० गाड्या बनवल्या जात असतील. हाच अनुभव बजाज आॅटोमध्येही येईल. किंबहुना देशातल्या कुठल्याही कंपनीत असाच अनुभव येईल. ही परिस्थिती भयावह असल्याची जाणीव जयंत पाटील यांनी करून दिली. २००९ च्या निवडणुकीत कदीर मौलाना हे अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी ते निवडून आले असते तर आजही मौलाना हेच आमदार राहिले असते, असे सांगत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले. अमोल मिटकरी, कदीर मौलाना, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी उपमहापौर तकी हसन, लक्ष्मण औताडे, नसीर पटेल, राजू औताडे, शमीम पटेल, गफारभाई आदींची मंचावर उपस्थिती होती.