Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:45 PM2019-10-09T12:45:00+5:302019-10-09T12:46:55+5:30
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुरु
औरंगाबाद : पश्चिम विधानसभा मतदारसंघात रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद ठरल्यानंतर कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, असा पेच काँग्रेससमोर उभा राहिला आहे. यासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेण्यासाठी उद्या, दि.९ आॅक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक डॉ. जितेंद्र देहाडे यांनी सांगितले.
सकाळी ११ वा. एएस क्लबसमोरील कैलास हॉटेलमध्ये ही बैठक होईल. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेच या बैठकीस अपेक्षित आहेत. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेवराव पवार व माजी खासदार उत्तमसिंह पवार यांची विशेष उपस्थिती राहील. यावेळी पदाधिकाऱ्यांची मनोगते ऐकून घेण्यात येतील. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कानावर बैठकीचा सूर घालण्यात येईल व नंतर जो काही व्हायचा तो निर्णय होईल.
रिपाइं डीचे रमेश गायकवाड यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची ही जागा सुटली होती. वस्तुत: काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु त्यांना डावलून गायकवाड यांना उमेदवारी दिली गेली. अर्जातील किरकोळ त्रुटी त्यांनी सांगूनही दूर न केल्यामुळे गायकवाड यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले.
या मतदारसंघात विद्यमान आमदार संजय शिरसाट हे तर उभे आहेतच; पण त्यांना भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांचा मुकाबला करावा लागणार आहे. काँग्रेसचा पाठिंबा अपक्ष उमेदवार विठ्ठल माळी व पंकजा माने यांनी मागितला आहे. विठ्ठल माळी हे तर नवखेच आहेत. पंकजा माने यांनी काँग्रेसमध्ये काम केलेले आहे व तिकीटही मागितले होते. ते न मिळाल्याने अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला.
पाठिंबा दिलेला उमेदवार सक्षम हवा
उद्या होणाऱ्या बैठकीत कुणाकडे पदाधिकाऱ्यांचा कल राहतो ते बघावयाचे. राजू शिंदे यांच्या नावाचा पाठिंब्यासाठी विचार होईल, असे दिसत नाही. माळी आणि माने या नावावर चर्चा होऊ शकेल. मात्र, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींना विचारून घेतला जाईल. पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला किमान पंधरा हजारांवर मते मिळाली पाहिजेत. काँग्रेसची पत तरी याठिकाणी राहिली पाहिजे, असे मानणाराही एक मतप्रवाह आहे.