- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : मैदानात कुणी पहिलवानच दिसत नाही, असं नाही. कुस्तीच्या मैदानात कोणता पहिलवान कशी कुस्ती मारील आणि नामांकित पहिलवानालाही चीत-पट करील, हे सांगता येत नसतं. सध्या महाराष्ट्रात असंच काहीसं चालू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही नऊच्या नऊ जागा आम्हीच जिंकू, अशा आविर्भावात युती असली तरी वस्तुस्थिती बदलत आहे. महायुतीला वाटतं तेवढं सोपं नाही.
विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांनी फुलंब्री मतदारसंघात तगडं आव्हान उभं केलं आहे. बागडेंमुळेच काळे यांना ही निवडणूक सोपी झाली आहे. भाजपने दुसरा उमेदवार दिला असता तर कदाचित काळे यांना अवघड गेलं असतं. बागडेंवर काळे रोज सडकून टीका करीत आहेत. शिवाय मागच्या वेळेसारखे राष्ट्रवादी वेगळे न लढल्यामुळे मत विभाजनाचा धोका दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते सिल्लोडच्या निवडणुकीकडे. कालच तेथे अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठी सभा झाली. काल-परवापर्यंत काँग्रेसमध्ये असलेल्या सत्तारांना महायुतीअंतर्गत भाजपनं स्वीकारलेलं नाही. तेथे भाजपने अपक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या पाठीशी शक्ती एकवटलेली आहे. सत्तार यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही.
कन्नडमध्येही काट्याची लढत सुरू आहे. रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या अस्तित्वाची तेथे लढाई आहे. पण त्यांच्या व शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांच्या भांडणात राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कोल्हे यांनी पूर्वीपासूनच निवडणुकीची केलेली तयारी व त्यांचा घरोघर असलेला जनसंपर्क! गंगापूर- खुलताबाद मतदारसंघात भाजपचे प्रशांत बंब हॅट्ट्रिक करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरवेळी त्यांना स्थानिक मराठा नेत्यांमधील दुफळीचा लाभ उठवता आला. यावेळी ही संधी मिळणार नाही, याची काळजी घेऊन शिवसेनेचे एकेकाळचे आमदार असलेले अण्णासाहेब माने यांचे चिरंजीव संतोष माने यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. त्यामुळे गंगापूरची निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही.
वैजापूरच्या निवडणुकीतही शिवसेनेचे रमेश बोरनारे यांना राष्ट्रवादीचे अभय पा. चिकटगावकर यांचे तगडे आव्हान आहे. त्यांचे चुलते भाऊसाहेब पा. चिकटगावकर यांची ही जागा अभय टिकवू शकतात काय, हे पाहणे औत्सुक्याचेच. पैठणच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. संजय वाघचौरे यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने दत्ता गोर्डे यांना उमेदवारी देऊन ही रंगत वाढवली आहे. संदीपान भुमरे या मतदारसंघातून सतत निवडून येत असतात. यावेळी मतदारांना बदल हवा असेल, तर तो होण्याची शक्यता आहे. प्रल्हाद राठोड (एमआयएम) व विजय चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) हे किती आणि कुणाची मते खातात, यावरही समीकरण अवलंबून आहे.
एमआयएमला या तीनही मतदारसंघात मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु त्या पूर्ण होतील असे दिसत नाही. तिकीट मिळण्यापासून ते आता प्रचारात सुरू असलेल्या लाथाळ्या पाहता एमआयएम उघडी पडत चालली आहे. आता वंचित बहुजन आघाडीसोबत नाही. वंचितने औरंगाबाद पूर्व सोडता दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. पूर्वमध्ये मुस्लिम उमेदवारांमध्ये मुस्लिम मतांचे विभाजन अटळ आहे. बसपाचा उमेदवार दलित मते खाणार.... याचा फायदा भाजपचे अतुल सावे यांना होणार, अशी स्थिती दिसत आहे.
औरंगाबाद पश्चिमच्या निवडणुकीची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा इथं बोलबाला सुरू आहे. त्यांच्यामागे मदतीचे अनेक अदृश्य हात पाहता विद्यमान आमदार संजय शिरसाट यांचे धाबे दणाणले आहेत. मागच्या टर्ममध्ये शिरसाट यांचा परफॉर्मन्स नीट राहिला नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे.
औरंगाबाद मध्यमधील यावेळची निवडणूक शिवसेनेला सोपी झालेली आहे. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आपापल्या परीने लढत आहेत. राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांची स्थिती २००९ सारखी राहिलेली नाही. दलित- मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फायदा शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना मिळू शकतो; परंतु नगरसेविका कीर्ती शिंदे यांचा सुनियोजित प्रचारही दखल घेण्याजोेगा आहे.