औरंगाबाद: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. एकूण ६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. तर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी आपले गड कायम राखले आहेत. मात्र औरंगाबादमधील एका ग्रामपंचायत निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. आईविरोधात मुलानं वडिलांचं पॅनल उभं केल्यानं निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता होती. त्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पुत्र आदित्यनं स्वत:च्या आईविरोधात पॅनल उभं केलं होतं. आदित्यनं स्वत:ची आई संजना जाधव यांच्या विरोधात हर्षवर्धन यांचं पॅनल उभं करत आव्हान दिलं. संजना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं रायभान जाधव यांची तिसरी पिढीही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर आदित्यनं स्वतः सर्व सूत्रं हातात घेतली. मात्र या निवडणुकीत जाधव यांच्या पॅनलला फारसं यश मिळालेलं नाही. त्यांच्या आई संजना यांनादेखील फारशी चमक दाखवता आली नाही.पिशोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव पती यांचा दारुण पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांना १७ पैकी ४ जागा जिंकता आल्या. तर संजना जाधव यांना केवळ २ जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं ९ जागांवर विजय मिळवला. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी सरशी साधली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन आणि संजना यांना धक्का बसला आहे.
Maharashtra Gram Panchayat Election Results: आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं करणाऱ्या आदित्यचा डाव फसला; वेगळाच निकाल लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 4:36 PM