पैठण : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लक्षात घेता पैठण तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा एकदा काट्याची लढत झाल्याचे पुढे आले आहे. कँबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी पाचोड ग्रामपंचायतीत बहुमताने एकहाती विजय मिळवत एकवटलेल्या विरोधकांना भुईसपाट केले आहे.
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून नव्याने यंदा काही ग्रामपंचायती ताब्यात घेऊन तालुक्यात शिवसेनेचा प्रबळ विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच आहे हे समोर आले आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग करून लढलेल्या ग्रामपंचायतीचे निकाल लक्षात घेता या ठिकाणी सहज विजय मिळाला असल्याचे लक्षात आले आहे. अनेक ग्रामपंचायतीत दिग्गजांना परावभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतच्या राजकारणात दबदबा निर्माण केलेल्या पँनल प्रमुखांना नाकारत पँनल मधील ईतर उमेदवारांना मतदारांनी विजयी केले आहे. विजय दुग्गड, शंकर वाघमोडे, अंकुश रंधे, कारभारी, लोहकरे, सुरेश दुबाले, शेरूभाई पटेल, अंकुश जावळे, निजाम पटेल, एकनाथ फटांगडे, उत्तमराव खांडे, मुस्तफा पठाण, भूषण सिशोदे, सुरेश चौधरी, दत्ता वाकडे,जगन्नाथ दूधे, अशा अनेक दिग्गजांना व त्यांच्या घरातील सदस्यांना ग्रामपंचायत राजकारणातून मतदारांनी दूर केले आहे. बहुतेक ग्रामपंचायतीवर मतदारांनी जुन्या सदस्यांना नाकारत नव्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. आप्पासाहेब निर्मळ, विनोद तांबे, किशोर दसपुते, रवींद्र शिसोदे, तुषार शिसोदे, सतिश शेळके, साईनाथ सोलाट, साईनाथ होरकटे, गणेश ईथापे आदीसह अनेक मातब्बरांनी पुन्हा एकदा आपल्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे. दरम्यान अनेक ग्रामपंचायतीचे निकाल त्रिशंकू लागल्याने या ग्रामपंचायती आमच्याच ताब्यात आल्या असल्याचा दावा महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षाकडून करण्यात येत आहे.
सख्ख्या जावातील लढत ठरली लक्षवेधीपैठण तालुक्याच्या राजकारणात ढाकेफळ व शिसोदे परिवाराचे मोठे योगदान आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिसोदे परिवारातील भाजपाचे माजी तालुका प्रमुख तुषार शिसोदे व त्यांचा सख्खा भाऊ भूषण शिसोदे या दोघांच्या धर्मपत्नी व सख्ख्या जावा असलेल्या रेखा तुषार शिसोदे व रूपाली भूषण शिसोदे यांनी एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढली होती. रेखा तुषार शिसोदे यांनी ही निवडणूक जिंकली. राजकीय घराण्यातील सख्ख्या जावांची लढत तालुक्यात मोठी चर्चेची ठरली होती. भाऊबंदकीला राजकारणाची फोडणी बसल्याने परिसरात या लढतीकडे लक्ष वेधले गेले होते.