पहिली ते दहावी वर्ग बंद करण्याची तयारी
-शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रक घेऊन जाण्याचे निरोप
-शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याचा शाळेचा दावा
-शिक्षणाधिकारी म्हणतात, प्रस्ताव नाकारला
-पालक संतप्त, विद्यार्थी चिंतित
औरंगाबाद : महेशनगर येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूलने राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या पहिली ते दहावी इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय घेत पालकांना गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जाण्याचे संदेश पाठवले. संतप्त पालकांनी शाळा गाठून विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व्यक्त केली. शिक्षणाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन हा निर्णय घेतल्याचा दावा शाळेने केला, तर शिक्षणाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याचे म्हटले आहे.
महेशनगर येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधील मराठी माध्यमाचे वर्ग यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. आता राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाचे पहिली ते दहावीचे इंग्रजी माध्यमाचेही वर्ग बंद करण्याचा निर्णय शाळेने पालकांना कळवला आहे. मात्र, कोरोनाचा काळ त्यात मध्येच शाळेतून दाखला घेऊन कुठल्या शाळेत प्रवेश मिळेल, अशा अनेक प्रश्नांसह पालकांनी शाळा गाठली, तेव्हा पालक शुल्क भरत नसल्याने असा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने पालकांना सांगितले. काही लोकांमुळे इतर बहुसंख्य विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे म्हणत अन्यायकारक निर्णयाला सर्वच पालकांनी विरोध दर्शविला. मात्र, शाळा प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे पालकांनी सांगितले. लवकरच सर्व पालक शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहेत. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी याप्रकरणी कोणतीही शाळा बंद करण्याची परवानगी दिली नसल्याचे सांगून शाळेने पत्रव्यवहार केला असेल मात्र, शाळा बंद करण्याची परवानगी देता येत नसल्याचे स्पष्ट केले.
-
मुलगा सातवीतून आठवीत जाणार आहे. मला शाळेने मॅसेजद्वारे गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जाण्याचे अचानक कळविले. त्याने धक्काच बसला. पूर्ण शुल्क भरून कार्यालयीन बाबींची पूर्तता करण्याचे सांगण्यात येत आहे. अडवणुकीचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे. मंगळवारी काही पाल्यांनी टीसी नेले. या अन्यायकारक निर्णयाला पालकांचा विरोध आहे.
-बाळासाहेब जोगदंड, पालक
----
शाळा बंद करण्यासाठी संस्थेने पत्रव्यवहार केला आहे. मात्र, शाळेचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यासंदर्भात शाळेला उद्या कळवण्यात येईल. तेथे आरटीईची मुलं आहेत. जोपर्यंत तेथील आरटीईची मुले आणि इतर विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत शाळा बंद करता येणार नाही. शिक्षण विभागाने महाराष्ट्र पब्लिक स्कूलला शाळा बंद करण्याची परवानगी दिलेली नाही.
-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग, जि. प. औरंगाबाद
--
महेशनगर येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूलही बंद करत आहोत. विनापरवानगी कशी बंद करणार? शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे. त्यांना सर्व गोष्टींची पूर्वकल्पना दिलेली आहे. त्यांच्या परवानगीनंतरच हा निर्णय घेतला.
-जयश्री शिंदे, मुख्याध्यापक, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, महेशनगर