औरंगाबाद : दीपक जावळेने कर्णधाराला साजेल अशी केलेली फलंदाजी आणि अभिलाष लोखंडे याचा अष्टपैलू खेळ या बळावर महाराष्ट्राने शुक्रवारी गरवारे क्रिकेट मैदानावर झालेल्या अखिल भारतीय टी-२० दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात राजस्थानवर ५ गडी राखून मात करीत विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत महाराष्ट्राचा ज्योतीराम घुले सर्वोत्तम फलंदाजाचा, तर कर्णधार दीपक जावळे सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा अभिलाष लोखंडे सलग दुसऱ्यांदा सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करताना राजस्थानला २० षटकांत ६ बाद १२६ धावांवर रोखले. त्यांच्याकडून नदीमने ५१ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ५० धावा केल्या. महाराष्ट्राकडून अभिलाष लोखंडे आणि धम्म जाधव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे २७ व १४ धावा मोजल्या. विकी रणदिवे व सय्यद एम. यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने विजयी लक्ष्य १६.१ षटकांत ५ गडी गमावून सहज गाठले. औरंगाबादच्या दीपक जावळे याने कर्णधाराला साजेशी खेळी करताना २६ चेंडूंतच ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ३७ धावा करीत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला ज्योतीराम घुलेने २५ चेंडूंत ३ चौकारांसह २७ आणि गोलंदाजीत चमक दाखविणाऱ्या अभिलाष लोखंडे याने २५ चेंडूंत ५ चौकारांसह २९ धावांची निर्णायक खेळी केली. अभिलाषने उपांत्य फेरीत आंध्र प्रदेशविरुद्धही शानदार अर्धशतकी खेळी करताना महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. राजस्थानकडून महावीरसिंग, सुरेश, कुलदीप, नरेंद्र यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. बक्षीस वितरण मनपा उपायुक्त महावीर पाटणी, महमद अली कुरैशी, विजय पांगरेकर, शिरीष खेडगीकर, क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, संजय चव्हाण, सय्यद जमशेद, प्रशांत भूमकर, संजीव सोनार यांच्या उपस्थिती झाले.
महाराष्ट्राने जिंकली अ.भा. क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:22 AM
दीपक जावळेने कर्णधाराला साजेल अशी केलेली फलंदाजी आणि अभिलाष लोखंडे याचा अष्टपैलू खेळ या बळावर महाराष्ट्राने शुक्रवारी गरवारे क्रिकेट मैदानावर झालेल्या अखिल भारतीय टी-२० दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात राजस्थानवर ५ गडी राखून मात करीत विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत महाराष्ट्राचा ज्योतीराम घुले सर्वोत्तम फलंदाजाचा, तर कर्णधार दीपक जावळे सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा अभिलाष लोखंडे सलग दुसऱ्यांदा सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
ठळक मुद्देदिव्यांग चषक टी-२० : अंतिम सामन्यात राजस्थानवर ५ गडी राखून विजय