औरंगाबाद : हैदराबाद येथे झालेल्या ६५ व्या सिनिअर राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राने अंतिम सामन्यात सेना दलाचा ३४-२९ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. महिला गटात हिमाचल प्रदेशने रेल्वेचा ३८-२५ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले.महाराष्ट्राच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरणाºया रिशांक देवाडिगा याने सर्वात जास्त १८ गुण नोंदवले. त्यात त्याने केलेल्या सुपर रेडचादेखील समावेश आहे.रिशांक देवाडिगा याने अफलातून खेळ करताना चढाईमध्ये सुरुवातीलाच सेनादलाचे ३ गडी बाद केले आणि त्यानंतर महाराष्ट्राने सेनादलावर प्रारंभापासूनच वर्चस्व राखले. मध्यंतराला महाराष्ट्राने १५-१२ अशी आघाडी घेतली होती. रिशांक देवाडिगा याला विकास काळे, गिरीश इरनाक, नितीन मदने, तुषार पाटील यांनी जबरदस्त खेळ करीत सुरेख साथ दिली. त्याआधी महाराष्ट्राने उपांत्य फेरीत कर्नाटकचा ३५-३४ असा पराभव करीत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. या लढतीतही रिशांक देवाडिगा हाच महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने निर्णायक रेडमध्ये महत्त्वपूर्ण गुण मिळवून देताना महाराष्ट्राला रोमहर्षक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. महाराष्ट्राने तब्बल दहा वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. या संघाला औरंगाबाद येथील एनआयएस प्रशिक्षक माणिक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, कार्यकारी अध्यक्ष दत्ता पाथ्रीकर आदींनी विजेतेपद पटकावणाºया महाराष्ट्र सिनिअर कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 11:58 PM