महाराष्ट्राचा कृष्णा उत्तरेत मदतीला धावला, ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये ३ दिवस बोगद्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 06:18 AM2023-11-30T06:18:54+5:302023-11-30T06:19:56+5:30
उत्तराखंडमधील बोगद्यात सुरू असलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये पुण्यातील एका कंपनीत सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर असलेला पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे हा पाच जणांच्या टीमसोबत तीन दिवस बोगद्यात काम करीत होता.
- राम शिनगारे
छत्रपती संभाजीनगर : बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ, तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत होती. या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये पुण्यातील एका कंपनीत सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर असलेला पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे हा पाच जणांच्या टीमसोबत तीन दिवस बोगद्यात काम करीत होता.
कामगारांना बाहेर काढण्यासाठी केंद्र शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत होते. त्यासाठी जगभरातून तज्ज्ञांना आमंत्रित केले. त्यात पुण्यातील सुरेश इंदू लेझर कंपनीच्या टीमलाही पाचारण करण्यात आले. त्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वर्धमान शाह, टेक्निकल संचालक प्रफुल्ल जोशी, सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर कृष्णा दळे, संदीप कुमार, मयूर वडमारे यांचा समावेश होता. लेझर कटिंग मशिनने ब्लेड कट करण्यासाठीची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली. ही संपूर्ण टीम तीन दिवस बोगद्यातच मुक्कामाला होती, अशी माहिती अभियंता कृष्णा दळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अतिशय गरिबीत शिक्षण
- पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील रहिवासी असलेल्या कृष्णा भाऊसाहेब दळे यांनी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१३ ते २०१७ या कालावधीत मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
-त्यांचे वडील कुंभार (मातीकामाचा) पारंपरिक व्यावसायिक असून, त्यांची दीड एकर शेती आहे. कृष्णा हा महाविद्यालयातही टॉपर होता.
-त्यांच्या कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार, विभागप्रमुख डॉ. रामचंद्र चोपडे, प्रा. सचिन लहाने यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कृष्णाचा अभिमान वाटतो
सीएसएमएसएस छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या पहिल्या बॅचचा कृष्णा दळे हा विद्यार्थी आहे. त्यांनी या माेहिमेत खारीचा वाटा उचलून जिल्ह्यासह महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. त्यांचा अभिमान वाटतो. - पद्माकरराव मुळे, सचिव, सीएसएमएसएस संस्था