छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले आहे. छत्रपती संभाजीनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे या दोन्ही महामंडळांचे कार्यालय आहे.
हे कार्यालय तूर्त तरी ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे प्रभारी व्यवस्थापक प्रमोद पोहरे यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू झालेली आहेत. पण मार्च २०२४ पर्यंत या महामंडळांसाठी केलेली प्रत्येकी ५० कोटींची तरतूद खर्ची करण्याचे मोठे आव्हान नक्कीच उभे ठाकले आहे. या दोन्ही महामंडळांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहेत. या दोन्ही महामंडळांना स्वतंत्र व्यवस्थापक मिळतात की नाही, हा प्रश्नच आहे. सध्या आवश्यक कर्मचारी वर्गसु्ध्दा या दोन्ही महामंडळासाठी उपलब्ध नाही, त्याची उपलब्धता कधी होऊ शकेल, हेही सांगता येत नाही.
फक्त तीन जणांनी केली चौकशीओबीसी महामंडळाच्या कार्यालयातील वसुली अधिकारी अनिता कन्नडकर यांच्याकडे या दोन्ही महामंडळाच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. दोन्ही महामंडळे सुरू होऊन काही दिवसच उलटलेले आहेत. परंतु आतापर्यंत फक्त तीन जणांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन चौकशी करून गेले.
जागरूकतेची आवश्यकतावीरशैव लिंगायत समाज व गुरव समाजासाठी ही महामंडळे अस्तित्वात आलेली आहेत. या दोन्ही समाजात अद्याप या महामंडळांबद्दल पुरेशी जागरूकता नाही. यासाठी त्या त्या समाजातील कार्यकर्त्यांनी व स्वत: ओबीसी महामंडळाने घरोघर जाऊन माहिती पुस्तिकांचे वाटप करणे, महामंडळांच्या काय योजना आहेत, हे समजावून सांगण्यासाठी शिबिरे आयोजित करणे यासारखे उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.
अशा आहेत योजनाया दोन्ही महामंडळांकडून पुढीप्रमाणे योजना राबवण्यात येणार आहेत. १) २०% बीज भांडवल योजना, २) एक लाखांपर्यंत थेट कर्ज योजना ३) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा दहा लाखांपर्यंतची कर्ज योजना,४) गट कर्ज व्याज परतावा योजना,५) कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, ६) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, ७) महिला स्वयंसिद्धी कर्ज व्याज परतावा योजना. या प्रत्येक योजनेबद्दलची सविस्तर माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली आहे.
हे व्यवसाय सुरू करता येतीलया योजनांतर्गत कुक्कुटपालन, ऑटो स्पेअर पार्ट्स, लाकडी वस्तू बनविणे, कापड दुकान, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, ॲल्युमिनियम फॅब्रिक शॉप, पुस्तकांचे दुकान, फळ-भाजीपाला विक्री दुकान, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर व पेंट शॉप, वीटभट्टी, टेलिरंग युनिट, वास्तुविशारद व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, हार्डवेअर व पेंट शॉप, ग्लास व फोटोफ्रेम सेंटर, दवाखाना, औषध दुकान, अभियांत्रिकी सल्ला केंद्र असे व्यवसाय सुरू करता येऊ शकतील.