लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘महात्मा गांधी यांच्याकडे एक इतिहास पुरुष म्हणून किंवा संत म्हणून पाहू नका. वर्तमानकाळासाठी, विश्वाच्या भविष्यासाठी, तसेच राजकारण, लोकशाही, समाजकारण व अर्थकारणासाठी गांधी विचार आवश्यक आहेत. विसाव्या शतकात गांधींनी मानवी मूल्यांची क्रांती घडविली’असे प्रतिपादन आज येथे आंतरराष्टÑीय ख्यातीचे विचारवंत डॉ. रॅमिन जहानबेगलू यांनी केले.ते एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात ‘गांधी अँड हिज रेलेव्हन्स टुडे’ या विषयावर व्याख्यान देत होते. एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम हे अध्यक्षस्थानी होते.जहानबेगलू म्हणाले, सत्ता आणि पैसा यात आज आपण गुरफटून गेलो आहोत. पण महात्मा गांधींनी समाजाला संघटित करण्याची कला दिली. विसाव्या शतकात अनेक तत्त्ववेत्ते, विचारवंत होऊन गेले. पण त्यात गांधींचे वेगळेपण आहे. त्यांनी मानवी जीवनाचे समग्र चिंतन केले आणि त्यानुसार कृती केली.गांधींनी इहवादी, धर्मनिरपेक्ष राजकारण, अध्यात्मिक नैतिकता यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. १९०९ साली हिंद स्वराज लिहिलं होतं. त्यात त्यांनी संस्कृतीच्या नावाने चाललेला उपभोगवाद व शोषणावरच प्रश्न चिन्ह उभे केले होते. औद्योगिक सभ्यतेने सर्व जगाला विनाशाकडे नेले आहे. १९०९ साली गांधींनी आताच्या हवामान बदलासारख्या प्रश्नांचा ऊहापोह केला होता. यावरून त्यांची दूरदृष्टी सिद्ध होते, याकडे जहानबेगलू यांनी लक्ष वेधले.
महात्मा गांधींनी घडविली मानवी मूल्यांची क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:44 AM