औरंगाबाद: जिल्हा परिषद निवडणूकमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे उघड झाले. यावेळी कॉंग्रेसच्या मीना शेळके व शिवसेनेच्या बंडखोर तथा विद्यमान अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांना ३०- ३० समान मते पडली. यामुळे शेवटी ईश्वर चिट्ठीद्वारे निवडीमध्ये महाविकास आघाडीच्या शेळके या विजयी झाल्या.
शुक्रवारी जिल्हा परिषद निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याने सभा तहकूब करण्यात आली होती. मात्र, शनिवारी दुपारी पुन्हा झालेल्या निवडणुकी प्रक्रियेतही तेच चित्रे कायम राहिले. महाविकास आघाडीच्या मीना शेळके आणि शिवसेना बंडखोर व विद्यमान अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. महाविकास आघाडीची मते फुटल्याने शेळके आणि डोणगावकर यांना ३० - ३० अशी समान मते पडली. यानंतर ईश्वर चिट्ठीद्वारे अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. समर्थ मीटकरी या विद्यार्थ्यांने काढलेल्या चिट्ठीद्वारे महाविकास आघाडीच्या मीना शेळके या विजयी झाल्या.
तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे लहानु गायकवाड हे विजयी झाले. त्यांना ३२ मते तर महाविकास आघाडीच्या शुभांगी काजे यांना २८ मते पडली. दरम्यान,मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारास मदत केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच उपाध्यक्षपदी भाजप विजयी झाल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.