‘पदवीधर’साठी महाविकास आघाडी; शिवसेनेतील इच्छुकांच्या आशेवर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 03:12 PM2020-11-11T15:12:35+5:302020-11-11T15:18:30+5:30
महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे चित्र निवडणुकीत असणार आहे.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासह राज्यातील इतर मतदारसंघांत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देण्याचा निर्णय तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत झाला. विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्यासाठीच जागा सोडण्याच्या धोरणानुसार औरंगाबाद विभागातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्व मदत करणार आहेत.
या धोरणामुळे शिवसेनेतील इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले. काही इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली होती; परंतु आता महाविकास आघाडीचा निर्णय झाल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे चित्र निवडणुकीत असणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. सोबत काँग्रेस आणि शिवसेना आहे. इतर जागांबाबत देखील असाच फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत उमेदवार दिले; परंतु यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी ही केवळ खडाखडी नाही, अस्मान दाखविले जाईल https://t.co/DmTDsJmKd8
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) November 11, 2020
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या सूचना
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असणार आहे.