औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासह राज्यातील इतर मतदारसंघांसाठी उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख एकत्रित बैठकीत निर्णय घेणार आहेत. बैठकीत निर्णय होणार असला तरी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्यासाठीच जागा सोडली जाणार, हे स्पष्ट असल्याचे मत शिवसेनेच्या वरिष्ठांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असेच चित्र निवडणुकीत असण्याची जास्त शक्यता आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही जागा तरी किमान राष्ट्रवादी काँग्रेस लढेल, सोबत काँग्रेस आणि शिवसेना असेल. इतर जागांबाबतदेखील असाच फॉर्म्युला असणार आहे. सध्या भाजपमध्ये या जागेसाठी तीन नावे चर्चेत आहेत, तर महाविकास आघाडीकडून एकच नाव आहे. एमआयएमदेखील मैदानात उतरणे शक्य आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत येथील जागा राष्ट्रवादीला जाणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे. निवडणुकीसाठी अधिसूचना निघाल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यामुळे यंदा शिवसेना या मतदारसंघात उमेदवार देणार नाही. असेच सध्या दिसते आहे. यापूर्वीच्या निवडणुका शिवसेना लढली आहे.
तिन्ही पक्षनेते एकत्रित निर्णय घेतीलशिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी सांगितले, अजून पक्षाच्या पातळीवर चर्चा नाही. तिन्ही पक्षांचे प्रमुख यामध्ये जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे काही नेते निर्णय घेतील. एकच पदवीधर मतदारसंघ नाही. कोकण, अमरावती, औरंगाबादबाबत वाटपाचा निर्णय होईल. तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेण्याचा फॉर्म्युला सध्या आहे. स्वतंत्र किंवा एकत्रित लढण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत होईल. सध्या तरी समान वाटप जागांबाबत होईल. ज्यांच्या ज्या जागा आहेत, त्या त्यांच्याकडेच राहतील. उमेदवार सक्षम असण्यावरच ही निवडणूक आहे. सध्या राष्ट्रवादीकडे जागा आहे, त्यामुळे ती जागा सहजासहजी इतर कुणाकडे जाईल, असे वाटत नाही.